तासगाव : तासगाव तालुक्यातील एका 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. तिला जबरदस्तीने चारचाकी गाडीतून नेऊन मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव येथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शिवाय येथून निघून गेल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल दगडू मंडले (रा. नागेवाडी) याच्यासह एका चार चाकी पांढऱ्या गाडीचा चालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तासगाव तालुक्यातील एका महिलेला संशयित आरोपी विशाल मंडले याने जबरदस्तीने तिच्या घरासमोरून गाडीतून नेले. तिच्यावर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे वारंवार बलात्कार केला. शिवाय तिचा पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी संबंधित पीडित विवाहितेने विशाल मंडले याच्यासह अन्य एका विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी नागेवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे हे करीत आहेत.
‘ती’ पांढरी गाडी कोणाची….?
नागेवाडी येथील संबंधित पीडित विवाहितेवर 28 जुलै 2024 ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत मळणगाव तसेच बेळगाव या ठिकाणी बलात्कार करण्यात आला. संशयित आरोपी विशाल मंडले याने हे कृत्य केले. विशालच्या या कृत्यात एका पांढऱ्या चार चाकी गाडीच्या चालकाचाही समावेश आहे. त्यालाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. मात्र ही चार चाकी गाडी नेमकी कोणाची आहे. या गाडीवर चालक म्हणून कोण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.