सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांसाठी ‘बीएच’ ही सीरिज सुरू केली आहे. नोकरदार कर्मचारी, अधिकारी यांची इतर कोणत्याही राज्यात बदली झाल्यास ‘बीएच’ सीरिजचे वाहन नोंदणी करिता तेथे वापरता येते. ‘बीएच’ नंबरप्लेटची गाडी देशात कोठेही चालते. या प्रकारातील वाहन क्रमांक घेतल्यास पुन्हा रजिस्ट्रेशन हस्तांतर करण्याची गरज भासत नाही. वेळ व पैसादेखील यामुळे वाचतो.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) ने जे कर्मचारी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करतात, त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागू नये यासाठी ‘बीएच’ सिरीज सुरू केली आहे. वास्तविक मोटार वाहन कायद्यानुसार नवीन राज्यात वाहन नोंदणीशिवाय केवळ १२ महिनेच चालवता येते. तेथे गेल्यानंतर तुमच्या वाहनाची नोंदणी न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकतो. सतत विविध राज्यात बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा कारवाईचा त्रास टाळण्यासाठी ‘बीएच’ सीरिज हा पर्याय निर्माण केला आहे. ‘बीएच’ नंबरप्लेट मिळवण्याचे अनेक फायदे आहेत.
कोठे करावा अर्ज?
कागदपत्रे परिवहन अधिकाऱ्यांकडून पडताळणी करावी लागते. शुल्क किंवा वाहन कराचे ऑनलाईन पेमेंट करावे लागते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रॅन्डम प्रकाराने बीएच सीरिजचा नोंदणी क्रमांक तयार केला जातो.
कसा कराल अर्ज?
बीएच सीरिज नंबरप्लेटसाठी ‘एमओआरटीएच’ या पोर्टलवर लॉग इन करावे.वाहन पोर्टलवर फॉर्म २० भरावा लागतो.खासगी नोकरदारांना फॉर्म ६० भरावा लागतो. ओळखपत्र द्यावे लागते.अर्ज करताना ‘बीएच’ सीरिज निवडावी लागते.
बीएच’ सीरिजसाठी कोण करू शकतो अर्ज?
जे नागरिक सैन्य दलात किंवा निमलष्करी दलात असतात त्यांना ही सीरिज मिळू शकते.जे राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, त्यांना ही सीरिज मिळते.ज्या खासगी कंपन्या किमान चार राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असतात त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील सीरिज मिळते.