सांगली : शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी प्रत्येक गावात मुख्यमंत्री योजनादूत नेमण्यात येणार आहे. याबाबतची ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक आणि शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक असे राज्यभरात ५० हजार ‘योजनादूत’ नेमले जाणार आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, हे या योजनादुतांचे काम असेल. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी असेल.
नियुक्ती झालेल्या योजनादुतांना शासनामार्फत दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणी या नियुक्तीसाठी पात्र आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर व महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना या उपक्रमासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करता येईल. त्याला संगणकाचे ज्ञान, स्मार्ट फोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे, अशी माहिती देण्यात आली.