आर. आर. आबांचे निर्मलस्थळ बनले बेवड्यांचा अड्डा | अंजनीतील प्रकार : कार्यकर्त्यांना जयंती आणि पुण्यतिथीलाच ‘आठवण’

0तासगाव : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यभर राबवून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या स्व. आर. आर. पाटील यांच्या अंजनी (ता. तासगाव) येथील निर्मलस्थळी मात्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये हे स्थळ बेवड्यांचा अड्डा बनले आहे. रात्रीच्यावेळी बेवडे याठिकाणी चकना आणि तुंबेच्या – तुंबे दारू रिचवून रंगात आलेले दिसतात. वारसदार आणि कार्यकर्त्यांना स्व. आबांची आठवण जयंती, पुण्यतिथी आणि भाषणापूरतीच होताना दिसून येतेय.


      आर. आर. पाटील म्हणजे राज्याच्या राजकारणातील वजनदार, वलयांकित व्यक्तिमत्त्व. उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. कोणत्याही पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले. आपल्या विविध खात्याच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यभर विविध योजना राबविल्या. त्या देशभर गाजल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर या योजनांची दखल घेण्यात आली. अंजनीसारख्या एका खेडे गावातून उदयाला आलेलं हे उमदं नेतृत्व होय.


      मात्र स्व. आबांची किंमत कार्यकर्त्यांना कधी कळलीच नाही. पिकतं तिथं विकत नाही, अशी म्हण आहे. आबांच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते. आबा हयात असताना त्यांची आणि त्यांच्या विचारांची किंमत कोणालाच कळाली नाही. आबांनी आपला पुरोगामीपणाचा विचार राज्यभर रुजवला. त्यांचे कार्यकर्ते मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांना देव बनवायला चालले होते.


       आबांच्या पश्चात अंजनी येथे समाधीस्थळ उभारण्यात आले आहे. या स्थळाला ‘निर्मलस्थळ’ असे नाव देण्यात आले आहे. राज्यभरातून आबांचा विचार मानणारे लोक इथे येतील, आबांचा विचार चिरंतन ठेवतील, अशी भावना हे स्थळ उभारण्यामागे होती. मात्र काहींनी या निर्मलस्थळाला देवस्थान आणि आबांना देव बनवण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. समाधीस्थळाच्या पुढील बाजूस ‘इथे नारळ फोडा, इथे अगरबत्ती लावा’, असले फलक लावले होते. आबांच्या पुरोगामीपणाला तिलांजली देण्यातला हा प्रकार होता.


      दरम्यान, आबांना जगाचा निरोप घेऊन आता सात वर्षे होत आली आहेत. गेल्या सात वर्षात आबा फक्त भाषण, जयंती, पुण्यतिथी आणि निवडणुकीचा अंगाला गुलाल लागल्यानंतर अभिवादनालाच उरले आहेत. त्यांच्या आचार – विचारांना कधीच मूठमाती देण्यात आली आहे. आबांचा मृत्यू कर्करोगाने झाला. त्यांच्या पश्चात रक्षाविसर्जनदिवशी गावाला व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली होती. मात्र ही शपथ कागदावरच राहिली आहे. गावात व्यसनाधीनता वाढत आहे. व्यसनी, दारुडे, गांजाडे लोकांनी आता गावाबरोबरच निर्मलस्थळावरही आपला अड्डा बनवला आहे.


      

Rate Card
लॉकडाऊनच्या काळात तळीराम रात्रीच्या चांदण्यात या निर्मलस्थळावर चकना, दारूचे तुंबे घेऊन रंगात आलेले दिसतात. हे बेवडे दारू आणि पाण्याच्या मोकळ्या बाटल्या तिथेच टाकून देतात. त्यांच्या सोबतीला गांजाडेही असतात. एकूणच या निर्मलस्थळाचे पावित्र्य नष्ट होत आहे. या दुर्दैवी प्रकाराकडे आबांचा मावळा म्हणून छाती बडवून घेणारे कार्यकर्ते व वारसदारांनी दुर्लक्ष केले आहे. महिनोंमहिने या स्थळाकडे कोणी फिरकतही नाही. याचाच गैरफायदा घेणाऱ्या तळीरामांनी या स्थळाला आणि पर्यायाने आबांना बदनाम करायचे कांड सुरू ठेवले आहे.


      
दुसरीकडे या निर्मलस्थळाची दुरवस्थाही होत चालली आहे. याठिकाचे गवती लॉन वाळत चालले आहे. भटकी कुत्री याठिकाणी आपला ‘कार्यक्रम’ उरकून घेतात. वास्तविक या स्थळाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे. निर्मलस्थळाला कंपाउंड घालून याठिकाणी एखादे बोअर मारून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. एखाद्या माणसाची याठिकाणी कायमस्वरूपी नेमणूक गरजेची आहे. जेणेकरून याठिकाणची निगा राखता येईल.


     
आबा हे राज्यातील थोर नेते होते. राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीचे ते प्रेरणास्थान आहेत. अशा स्थितीत या निर्मलस्थळाचे पावित्र्य टिकवून याठिकाणी लोक पर्यटनाला येतील, जाताना आबांचा विचार घेऊन जातील, अशी व्यवस्था करायला हवी. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, हीच खेदजनक बाब आहे.


दरम्यान, या निर्मलस्थळावर बेवड्यांनी आपला अड्डा केल्याच्या बातमीनंतर बिरणवाडी येथील कुलदीप मोरे आणि वज्रचौंडे येथील जितेंद्र सरवदे यांनी पोत्यातून याठिकाणचा कचरा, दारू आणि पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास गोळा केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.