पुणे : पतीच्या आजोबांनी लग्नानंतर बक्षीस म्हणून दिलेल्या स्कूटरचा ताबा नात सुनेला द्यावा, असा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिला.न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पतीने आठ दिवसांतच स्कूटर पत्नीच्या ताब्यात दिली आहे. ताबा मिळालेल्या दुचाकीची विक्री करू नये तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिच्यात काही बदल करू नयेत, असे आदेशात नमूद आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आसिफ आणि शबाना यांचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी आसिफ यांचे आजोबा अब्दुल (सर्व नावे बदललेली) यांनी एक स्कूटर शबाना यांना बक्षीस म्हणून दिली होती.स्कूटरची खरेदी शबाना यांच्या नावाने करण्यात आली होती. त्यामुळे ती शबाना यांच्या नावावर होती. तर, स्कूटरचे पैसे अब्दुल यांनी दिले होते.
लग्नानंतर काही महिन्यांनी आसिफ आणि शबाना यांच्यात वाद झाल्याने त्या स्वतंत्र राहात आहेत. त्यांनी सासरच्या मंडळीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला आहे. बक्षिस मिळालेली स्कूटर मिळावी, अशी मागणी त्यांनी पतीकडे केली होती. मात्र, त्यास पतीने नकार दिल्याने स्कूटरचा ताबा मिळावा म्हणून शबाना यांनी अँड.जान्हवी भोसले यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता.त्यास असिफ यांनी विरोध करीत स्कूटरचे पैसे माझ्या आजोबांनी दिले होते, अशी भूमिका घेतली होती.