ठेकेदारांची मिजास खपवून घेतली जाणार नाही ; या नेत्याने दिला इशारा

0तासगाव : तासगाव शहरातील भुयारी गटार योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी गटारींची कामे गतीने करा, अशा सूचना खासदार संजय पाटील यांनी नोबेल इन्फ्राच्या अभियंत्याला दिल्या. यावेळी कामाबाबत आणि कामावर असलेल्या मजुरांबाबत योग्य माहिती देता न आल्याने खासदार पाटील अभियंत्यावर भडकले. ठेकेदारांची मिजास खपवून घेतली जाणार नाही. तातडीने त्यांना नोटीस काढा, अशीही सूचना यावेळी खासदारांनी जीवन प्राधिकरणाचे श्री. कुलकर्णी यांना दिली.


     
शहरातील पहिल्या फेजमधील भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. लाखो रुपये खर्चून ही कामे होत आहेत. नोबेल इन्फ्रा ही कंपनी गटारींची कामे करीत आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत दिली होती. मात्र गेल्या दोन वर्षात निम्मेही काम झाले नाही. या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते उकरले आहेत. बऱ्याच ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. परिणामी यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ शकतो.


       
या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पालिकेत बैठक घेतली. यावेळी नोबेल इन्फ्राच्या अभियंत्यावर खासदारांनी जाळ काढला. काम गतीने झाले पाहिजे, असे खडसावून सांगताना तुझ्याकडे किती कामगार आहेत, अशी विचारणा सबंधित अभियंत्याला केली. यावर अभियंत्याला लवकर उत्तर देता आले नाही. त्यामुळे खासदार चांगलेच भडकले. अभियंता आहेस की तिथे कामाला आहेस, असे म्हणून जीवन प्राधिकरणाचे श्री. कुलकर्णी यांना सबंधितांना नोटीस काढण्याचे सांगितले. 

Rate Card


     कोण जहागीरदार असला तरी त्याची मिजास खपवून घेतली जाणार नाही. शहरातील भुयारी गटारची कामे गतीने झालीच पाहिजेत. येत्या पावसाळ्याच्या अंदाजावर कामे करा. पावसाळ्यापूर्वी कामे होत नसतील तर उगाच रस्ते उकरून ठेवू नका. लोकांना त्रास झाला तर माझ्याशी गाठ आहे. कामगार वाढवून कामे करा, असेही खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.


     
बैठकीस नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्ष संतोष बेले, मुख्याधिकारी पृथ्वीराज माने – पाटील, नगरसेवक जाफर मुजावर, किशोर गायकवाड, बाबासाहेब पाटील, सचिन गुजर यांच्यासह दिग्विजय पाटील, अरुण साळुंखे व अन्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.