मद्यपान करून गाडी चालवताना नियंत्रण सुटले आणि भरधाव स्कार्पिओ दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील सहा महिन्याच्या बाळासह आई, एक लहान मुलगी आणि आजीचा मृत्यू झाला तर वडील आणि मावशी गंभीर जखमी झाले. ही मन हेलावणारी घटना संभाजीनगर जिल्ह्याच्या लिंबेजळगाव जवळ घडली. मृतात अमरावती इथल्या मृणाली अजय देसरकर (३६), आशालता हरिहर पोपळघट (६४) आणि अमोघ देसरकर (६ महिने) दुर्गा सागर गीते (७) यांचा समावेश आहे. तर अजय देसकर आणि शुभांगीनी सागर गिते (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अमरावती इथले अजय देसकर हे पुण्यात अभियंता पदावर काम करतात. ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर या गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. दहा वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. हा आनंदाचा सोहळा आटोपल्यावर अजय यांनी पुण्याला बाळाची काळजी घेण्यासाठी मृणालची आई आशालता पोपळघट, बहिण शुभांगीनी गिते यांना देखील सोबत घेतलं.
दोन आरोपींना पोलीस कोठडी
मद्य प्राशन करुन स्कॉर्पिओ गाडी चालविणाऱ्या विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (२२) आणि कृष्णा कारभारी केरे (१९) हे गंगापूरहून संभाजीनगरकडं येत असतांना भरधाव असलेली गाडी नियंत्रणात न आल्यानं ती दुभाजकावरुन उडून थेट समोरुन येणाऱ्या गाडीवर धडकली. त्यामुळे वरील चौघांचा मृत्यू झाला.प्रकरणात दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गंगापुर न्यायालयाने आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली.
अमरावतीवरुन सकाळी कारनं सहाजण पुण्याला जात होते. सायंकाळच्या सुमारास लिंबेजळगाव परिसरात रस्त्यावरुन जात असताना समोरुन भरधाव आलेल्या स्कार्पिओनं देसकर यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मृणाली त्यांच्या आई आशालता, नातेवाईक असलेली ७ वर्षीय दुर्गा आणि सहा महिन्याचा अमोघ यांचा मृत्यू झाला, तर अजय देसकर आणि शुभांगीनी गिते हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. याप्रकरणात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा वर्षांनी मूल झालं, तेही हिरावलं
■ अमरावती इथले अजय देसकर हे पुण्यात अभियंता पदावर काम करतात.■ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर या गेल्या काही वर्षापासून पुण्यात वास्तव्यास आहेत. लग्न होऊन दहा वर्षे झाले तरीही त्यांना बाळ होत नव्हतं.■ मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात पाळणा हलला. कुटूंबाचा आनंद गगणात मावेनासा झाला.■ कुटुंबीयांनी अमरावती इथं या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केला. दोन दिवसांपूर्वी या गोंडस बाळाला अमोघ असं नाव त्यांनी दिलं. पण, नियतीनं सारंच हिरावलं.