राज्यात काही अपवाद वगळता शांततेत आणि उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध दुर्घटनांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १८ जणांचा बुडून मृत्यू झाला.
डीजेच्या आवाजाने एकाचा तर चाकाखाली चेंगरून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा धुळे जिल्ह्यातील आहेत. मिरवणुकीत नाचताना वाहनाच्या चाकाखाली गेल्याने चौघांचा तर खदानीत बुडून दोन भावांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात चौघे तर अमरावतीत तिघे बुडाले. पुणे, नांदेड, अहमदनगर, परभणी, नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर अकोला, सोलापूर, पालघर जिल्ह्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
ट्रॅक्टरखाली चौघांचा मृत्यू
धुळे : चितोड गावात मिरवणुकीत नाचताना ट्रॅक्टर अचानक पुढे नेल्याने त्याखाली चिरडून चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन बालके आणि एका तरुणीचा समावेश आहे.
डीजेमुळे एकाचा मृत्यू गणपती विसर्जनाच्या दिवशी डीजे
लावल्याने डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने परभणी जिल्ह्यातील बोर्डी येथील संदीप विश्वनाथ कदम (वय ३७) याचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यात दोन तरुणांचा मृत्यूपुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या दोन तरुणांचा (वय २७ आणि वय ३५) मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हा डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याची दाट शक्यता आहे. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससूनला करण्यात आले आहे. त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत अधिक तपासणी करण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. नयन रवींद्र ढोके (वय २७, रा. औंध) आणि विशाल बल्लाळ (वय ३५ रा. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. नयन हा मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विजय टॉकीजवळ निपचित पडलेला दिसला. विशाल याला विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी दुपारी २ वाजता ससूनला आणले. डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.