गणपती विसर्जनानिमित्त मंगळवारी शहरात सर्वत्र धामधूम सुरू होती. समतानगरातील अनिता ढोले यांच्या घरीही गणपती विसर्जनासाठीची लगबग सुरू होती. अनिता ढोले या आपल्या घरातील गणरायाचे विसर्जन करून घरी परतल्या आणि घराचा दरवाजा उघडताच एकुलत्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसले. ही घटना मंगळवारी शहरातील समतानगरात ७ वाजता घडली.
दीपक नारायण लोहार (वय २८, रा. समतानगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दीपक लोहार हा मूळ जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील रहिवासी होता.काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर दीपक जळगाव शहरातील समतानगरात राहणाऱ्या अनिता ढोले या त्याच्या बहिणीकडे राहायला आला होता, तर आई तोंडापूरलाच राहत होती.
दीपक हा रिंगरोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. दीपक हा पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या पश्चात आई व पाच विवाहित बहिणी असा परिवार आहे.