सोने आणि रोख रक्कम गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत दीडपट करून देण्याचे आमिष दाखवून उचगाव (ता. करवीर) येथील एका सराफ व्यावसायिकांसह काही लोकांना सुमारे २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या सराफाने कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांकडे आणि गांधीनगर पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. ऑगस्ट २०२२ ते २०२३ या काळात ही फसवणूक झाली आहे.
शंकर नाना मुसळे यांच्या ओळखीतून रियाज मुरसल (रा. मणेर मळा, भोसले पेट्रोल पंपासमोर उचगाव ता. करवीर) यांनी ही फसवणूक केल्याचे तक्रारदार स्वप्निल सूर्यकांत पोरे (रा. उजळाई कॉलनी सरनोबतवाडी ता. करवीर) यांनी म्हटले आहे. तक्रारीतील तपशील असा पोरे यांचे स्वाती ज्वेलर्स नावाचे घराजवळच ५-६ वर्षांपासून सराफ दुकान आहे. हे दुकान भाड्याच्या गाळ्यात असून त्या गाळामालकाचे नाव शंकर मुसळे आहे. त्यातून पोरे यांचे त्यांच्याशी संबंध निर्माण झाले. मुसळे यांनी त्यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देऊ शकतो, असे आश्वासन दिले. तुमच्या दोघांची समाजात चांगली ओळख आहे.
त्यातून लोकांकडून पैसे घ्या, त्या गुंतवणुकीची जबाबदारी आम्ही घेतो, असा दावा मुरसल याने केल्याने मित्र नातेवाईक, नेहमीचे ग्राहक यांच्याकडून रक्कम घेऊन मुरसल यांच्याकडे गुंतवणूक केली. सहा-सात महिन्यांनंतर गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा मागितला असता मी गुंतवलेल्या ठिकाणी माझे नुकसान झाले आहे, असे सांगून मुरसल याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ही गुंतवणूक मुसळे यांच्या सांगण्यावरून केली आहे. केले आहेत.