बदनामीच्या भितीने उचलले पाऊल
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील माजी सरपंच विष्णू रामा पाटील (वय ६६) यांनी गावातील कृष्णा भावकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील यांच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन केल्याने त्यांचा दवाखान्यात मृत्यू झाला. प्रदीप विष्णू पाटील (वय ३९, रा. हडलगे) यांनी फिर्याद दिल्याने आरोपीविरुद्ध नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
आरोपी व मयत हे एकाच गावातील रहिवासी आहेत. मयत विष्णू पाटील यांनी, भावेश्वरी ग्राम प्रतिष्ठान या व्हॉटस् अँप ग्रुपवर वरील चार आरोपी मला त्रास देत असून त्यांनी गावातील एका महिलेला व तिच्या मुलाला हाताशी धरून मला बदनाम करत आहेत म्हणून मी माझ्या इज्जतीला भिऊन आत्महत्या करीत आहे असा संदेश पाठवला. त्यांच्यावर गडहिंग्लज येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
या घटनेमुळे संतापलेले हडलग्याचे काही ग्रामस्थ विष्णू पाटील यांचे पार्थिव घेऊन शववाहिका पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर उभी केली आणि आरोपींवर गुन्हा नोंद झाल्याशिवाय शव हलवणार नाही अशी भूमिका घेतली.