जत: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आघाडी आणि युतीचे नेते हे तिकिटासाठी मुंबई वारी करतांना पाहायला मिळत आहे. पण जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत हे मतदार संघात कोट्यवधींचा निधी मंजूर करून विकासकामांचा वर्षाव करत आहे.या दोन दिवसात आ.सावंत यांनी ०२ कोटी ०६ लक्ष इतका निधी मंजूर करून तालुक्यातील दरिकोनूर,दरीबडची,संख,भिवर्गी, मोरबग्गी,लवंगा,तिकोंडी व मोटेवाडी,सिद्धनाथ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.या कामांमध्ये रस्ता डांबरीकरण,जि.प. शाळेचे नूतनीकरण,चेकडॅम बंधारा बांधणे,गावातील मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरविणे ,पेव्हिंग ब्लॉक बसविणे इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.
या आधीही २ कोटी ७८ लाख इतका निधी मंजूर करून विकासकामांचे भूमिपूजन केले होते. अजूनही हि विकासाची गंगा निरंतर वाहतांना बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी गावकऱ्यांनी आ.सावंत यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.तसेच यावेळी आ.सावंत म्हणाले कि राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक जाहीर सभेत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे.परंतु आपल्या नेतृत्वाखाली विकासकामे करताना कोणताही जात, धर्म, किंवा समाजभेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी निधी मंजूर करून कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या “इस नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोली है” या घोषणेचा उल्लेख करत, आ.विक्रम दादा सावंत यांनी आपल्या कामातून समाजातील सर्व घटकांसाठी विकास साधण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले.काही दिवसांपूर्वी तूबची बबलेश्वरचे पाणी जतच्या पूर्व भागात पोहोचवून तालुक्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढल्याचेही त्यांनी सांगितले.

अजूनही मतदारसंघात विविध विकासकामांचे उदघाटन होत राहतील आणि जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी आ.विक्रमसिंह सावंत यांच्यासह बाबासाहेब कोडग,महादेव पाटील,सुजय नाना शिंदे, पिराप्पा माळी,बाबासाहेब माळी,बिराप्पा शिंदे,अमीन शेख,शिवानंद मोरडी ,संजय माळी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.