डफळापूर : बांधकाम कामगार मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत शासनाकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते; परंतु आजही बागणी परिसरातील अनेक कामगारांची मुले शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. कामगारांनी अर्ज केल्यानंतर बराच काळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शासनाने जी सोय केली, यामुळे अनेक कामगारांच्या मुलांना याचा लाभ झाला. अनेकांना यामुळे चांगले शिक्षण मिळत आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना दोन हजार पाचशे रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पूर्वी ही शिष्यवृत्ती सादर केलेल्या अर्जाचा विचार करून लाभार्थी पालकाच्या खात्यावर जमा केली जात होती; परंतु मागील वर्षापासून भरलेल्या अर्जाची शहानिशा करण्यासाठी ऑनलाइन तारीख दिली जाते.कामगाराने अर्ज भरल्यानंतर दिलेल्या तारखेला कामगाराला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालात हजर राहावे लागते.
कागदपत्राची सत्यता तपासल्यानंतर त्यांची अंमलबजावणी होते.तसेच अर्ज सादर केल्यानंतर तारीख ऑनलाइन मिळते. ती जवळजवळ आठ ते नऊ महिन्यांनंतरची असते. त्यावेळी कागदपत्रे घेऊन जाताना एखादा कागद राहिल्यास तो अर्ज बाद केला जातो. त्यासाठी त्याला परत कागदपत्रे सादर करण्याची संधी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दिली जात नाही. त्यामुळे कामगार लाभार्थ्याने पुन्हा अर्ज केल्यास त्याची तारीख आता १४ महिन्यांनंतरची मिळते. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहतात. नवीन अर्ज केल्यानंतरही कागदपत्रे तपासणीची ४ महिन्यानंतर तारिख मिळते
दहा दिवसांत अंमलबजावणी हवी
कामगारांची आर्थिक अवस्था पाहिल्यास त्याला मुलाच्या शिक्षणासाठी बँकेच्या दारात जावे लागते. तेथे लवकर कर्ज मिळत नाही. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासनाने तपासणीची तारीख, कागदपत्रे अपलोड केल्यापासून दहा दिवसांची तारीख द्यावी किवा कामगार पाल्याच्या कॉलेजमध्ये, शाळेत चौकशी करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.