
सांगली: सांगली मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळ मार्केट आणि जत दुय्यम बाजार आवारामधील रस्ते, संरक्षक भिंतीसह अन्य मूलभूत सुविधांसाठीच्या सात कोटी सहा लाख रुपये खर्चाला पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर कामाची निविदा निघून कामाला सुरुवात होणार आहे.
सांगली मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारापासूनच खड्यांची मालिका सुरू आहे. या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. यासंबंधित व्यापाऱ्यांनीही मागणी केली होती. त्यानुसार बाजार समिती संचालक मंडळाने पणन संचालकांकडे रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव पाठविला होता. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ३३ लाख आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी ३० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
विष्णूअण्णा फळ व कांदा, बटाटा मार्केटमध्ये सौद्याचा हॉल बांधणे, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी ४० लाख रुपयांनाही पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. जत येथील दुय्यम बाजार आवारातील रस्ते काँक्रिटीकरण आणि शौचालय बांधण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या खर्चाला पणन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच कामे सुरू होतील, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.
पणन संचालकांकडून या कामांना मंजूरी
विष्णूअण्णा फळ मार्केटमधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, सौद्यासाठी हॉल : ३.४० कोटी,बाजार आवारामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, संरक्षण भिंत, शौचालये : ३ कोटी,मार्केट यार्डामध्ये रस्ते : ३३ लाख,मार्केट यार्डामध्ये संरक्षण भित : ३० लाख