गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करणाऱ्या १३७ मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. डीजेचा वापर करून आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी जिल्हाभरात ही कारवाई करण्यात आली आहे. लेसर लाईटप्रकरणी १० मंडळावर कारवाई केली आहे.
यंदाचा गणेशोत्सव डीजे व लेसरमुक्त करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांनी केले होते. गणेशोत्सव व ईद एकाचवेळी असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली होती. जिल्ह्यात गणेश मंडळांच्या ३१७, मूर्तिकारांच्या २४, शांतता समितीच्या ५४, मोहल्ला कमिटीच्या ३०, पोलिस मित्रांच्या ४४ बैठका झाल्या. याशिवाय २८ ठिकाणी दंगा काबू प्रात्यक्षिक व ४४ संचलन करण्यात आले.
७९ गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविला. तर ५४७३ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. २ लाख ५५ हजार घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. या कालावधीत मागील दहा वर्षांतील दाखल गुन्ह्यातील १४०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त, लेसरमुक्त करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. लेसरवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेशही लागू केला होता. तरीही अनेक मंडळांनी डीजेचा वापर केला. पोलिसांनी जिल्ह्यातील ३१३ गणेश मंडळांचे ध्वनी मापन यंत्राद्वारे रीडिंग घेतले. त्यातील १३७ मंडळांनी मर्यादा ओलांडली.