लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंला एकही जागा सोडण्यात आली नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भातील उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड व वाशिम विधानसभा मतदारसंघांसह राज्यात किमान १२ विधानसभेच्या जागा मिळाव्यात. यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी रिपाइंसाठी प्रत्येकी ४ जागा सोडाव्यात, अशी अपेक्षा रिपाइं (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केली. आमचे उमेदवार हे रिपाइंच्याच चिन्हावर लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही १८ जागांची एक यादी तयार केली आहे. त्यापैकी किमान १२ जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे, खोटा प्रचार केल्यामुळे लोकसभेला विरोधी पक्षाला यश मिळाले, तसे यश आता मिळणार नाही.
आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर
प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक राजकारण करावे, आंबेडकर आणि मी (आठवले) दोघेही एकत्र आलो, तर दलितांना सत्तेचा अधिकाधिक वाटा मिळू शकतो. आंबेडकरांनी महायुतीत यावे, त्यांना मंत्रिपद मिळविण्यासाठी मी प्रयत्न करेन, असेही आठवले म्हणाले.