दारू पिऊन जावई मुलीस त्रास देतो, तिचे जगणे मुश्कील केले आहे. या संतापातून सासू व सासऱ्याने एस.टी. बसमधून प्रवास करत असताना जावयाचा पँटच्या नाडीने गळा आवळून खून केला. बुधवारी रात्री गडहिंग्लज ते कोल्हापूर बसमध्ये ही घटना घडली. कोल्हापूर बसस्थानकात मृतदेह फेकून संशयित पळून गेले होते. शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. मूळ गाव चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे मृत जावयाचे नाव आहे. तर या खून प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सासरा हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८), सावत्र सासू गौरवा हणमंताप्पा काळे (वय ३०, दोघे, रा. हुनिगनाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांना अटक केली.
शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिरोळ चिंचवाड संदीप शिरगावे तालुक्यातील गावातील संदीप शिरगावे आणि गडहिंग्लज येथील करुणा काळे यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. संदीप हा वाहनचालक म्हणून नोकरी करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आल्यावर तो पत्नीला त्रास द्यायचा, मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला पत्नी कंटाळली होती.
दोन महिन्यांपूर्वी करुणा पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेली होती. पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी संदीप सोमवारी (दि. २३) गडहिंग्लज येथे सासरवाडीला गेला होता. दोन दिवस राहिला. तेथे गेल्यावरही
त्याने पत्नीशी वाद घातला.
सासू-सासऱ्यांना शिवीगाळ केली. पत्नीने त्याला पैसे देऊन तुझ्या गावी जा, मी येणार नाही, असे म्हणून तेथून हाकलून लावले. बुधवारी दुपारी संदीप गडहिंग्लज स्थानकात बसची वाट पाहात थांबला होता. तो दारूच्या नशेत होता. याचदरम्यान त्याचे सासू-सासरे कोल्हापूरला जाण्यासाठी बसस्थानकात आले होते. रात्री तिघेही गडहिंग्लज- कोल्हापूर विनावाहक एस.टी. बसमधून कोल्हापूरला येत होते. बसमध्ये चार ते पाच प्रवासी होते.