जत : जामीन करून देण्यासाठी ७० हजारांची मागणी करून वीस हजार रुपयांची लाच घेताना जत पोलिस ठाण्यातील हवालदाराला सांगलीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय ४८) असे त्याचे नाव असून गुरुवारी सायंकाळी कारवाई झाली. जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मारामारीच्या गुन्ह्यात आठ संशयित असुन पैकी सात जणांना २३ सप्टेंबर रोजी अटक झाली होती. उर्वरीत एक संशयिताला अटक करणे बाकी होते. तपासात मदत करुन संशयितांना न्यायालयीन कोठडीची मागणी करुन जामीन करुन देण्यासाठी २० हजार रुपये व अटक होणे बाकी असलेल्यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपये अशी रक्कम तक्रारदारांकडे मागणी केली होती.
२६ सप्टेंबर रोजी सांगलीच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार आली होती. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार पडताळणी केली असता लोकसेवक पोलीस हवालदार कोळेकर यांनी जत
पोलीस ठाणे येथे दाखल मारामारीच्या गुन्ह्यात संशयितांना तपासात मदत करतो म्हणून ७० हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती २० हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. जत पोलीस ठाणे येथे सापळा लावन कारवाई करण्यात आली.