महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यातच मंत्रालयातील कामाची लगबग सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येत्या १३ तारखेनंतर केव्हाही निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी हरयाणा व जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्यानंतर १० तारखेला या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम संपुष्टात येईल. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. त्यामुळे १४ तारखेपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केव्हाही महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो.
विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे घटनात्मक तरतुदींनुसार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सामान्यतः ४५ दिवसांच्या आत नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. त्यामुळे १३ ऑक्टोबरनंतर केव्हाही राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्रालयात हालचाली वाढल्या दुसरीकडे, ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहित धरून मंत्रालयातील हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे प्रस्ताव व फायलींच्या मंजुरीचा वेग कैकपटीने वाढला आहे. विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीत तर निर्णयांचा धडाका सुरू आहे. दिवसाकाठी अनेक निर्णय हातावेगळे केले जात आहेत.
यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची धावाधाव सुरू आहे.