तासगाव : तासगाव येथे माजी खासदार संजय पाटील व विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोघेजण एकमेकांना भिडले. तासगाव येथील बाह्यवळण रस्त्याच्या निधीवरून दोघांमध्ये जुंपल्याचे पहायला मिळाले. यावेळी संजय पाटील यांचे कार्यकर्ते विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासमोर हा तमाशा घडला.
तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुमन पाटील, माजी खासदार संजय पाटील उपस्थित होते. सुमारे 13 कोटी रुपये खर्च करून ही सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे.दरम्यान भाषणावेळी आमदार सुमन पाटील म्हणाल्या, तासगाव पालिकेची सुसज्ज इमारत असावी, असे स्व.आर. आर.पाटील यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न आज पूर्णत्वास जात आहे, याचा मला आनंद आहे.
यानंतर खासदार विशाल पाटील भाषणास उठले. ते म्हणाले, तासगावमध्ये आल्यानंतर ठिकठिकाणी विकास कामांचे बॅनर लागल्याचे दिसून आले. यावरून तासगावात मोठ्या प्रमाणावर विकास होत असल्याचे लक्षात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगावातील बाह्यवळण रस्त्यासाठी 173 कोटी रुपये मंजूर केले. विरोधी गटाच्या आमदाराच्या मागणीलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, याचा मला आनंद आहे.
ते म्हणाले, गडकरी मला विटा येथे भेटले होते. ते मला म्हणाले, रोहित पाटील यांनी तासगावच्या बाह्यवळण रस्त्याबाबत अनेक वेळा निवेदने दिली होती. या कामाला मंजुरी दिली आहे, असा निरोप रोहित पाटलांना द्या.
यानंतर माजी खासदार संजय पाटील भाषणास उभे राहिले. दरम्यान विशाल पाटील यांनी बाह्यवळण रस्त्याच्या निधीचा विषय काढून त्याचे श्रेय रोहित पाटील व आमदार सुमन पाटील यांना देण्याचा प्रयत्न केल्याने संजय पाटील थोडेसे चिडले होते. विशाल पाटील यांनी डिवचल्याने त्याला प्रत्युत्तर देताना संजय पाटील म्हणाले, विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात. माझे आणि नितीन गडकरी यांचे संबंध फार जुने आहेत. तुम्हाला मानाने बोलवले आहे तर मान घ्यायचं बघा. राजकारणात मतभेद असतात. मात्र, दुसऱ्याने केलेल्या कामात जाऊन नाचायचे. बोर्ड लावायचे, इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये. तुम्ही असली नौटंकी बंद करा. असला बाजारबुणगेपणा बरा नाही.
संजय पाटील यांनी विशाल पाटील यांचे नाव घेऊन भर व्यासपीठावर टीका केल्याने विशाल पाटील चांगलेच भडकले. मी तुमचा भाषणात सन्मान ठेवला आहे. तुमच्या तालुक्यातील राजकारण तुमच्या तालुक्यात चालू द्या.मला त्याच्याशी देणंघेणं नाही. पण मी भाषणादरम्यान तुमचा योग्य तो मानसन्मान ठेवला आहे, असे विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना सुनावले.याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरुवात झाली.
विशाल पाटील बसलेल्या जागेवरून उभे राहिले. संजय पाटील यांच्याकडे हातवारे करून बोलू लागले. परिणामी सभागृहातील वातावरण तापले. याचवेळी संजय पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बसलेल्या जागेवरून उठून विशाल पाटील यांच्या दिशेने हातवारे व बोटे करून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते व्यासपीठावर विशाल पाटील यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस व्यासपीठावर गेले. पोलिसांनी विशाल पाटील यांना गराडा घातला. तर संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मागे ढकलून लावले. याचवेळी संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना उद्देशून ‘सुपारीबहाद्दर’ असा उल्लेख केला. त्यामुळे बराच काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांना शिवीगाळ केली. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. एकाला तर चांगलीच मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास गालबोट लागले. माजी खासदार संजय पाटील व विद्यमान खासदार विशाल पाटील आमने-सामने येऊन भिडल्याची चर्चा वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली. या प्रकारामुळे तासगाव तालुक्यात मात्र तणाव निर्माण झाला आहे.