मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निव निवडणुकीचा बिगुल वाजताच महायुती सरकारने बुधवारी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती सरकारने आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामे केल्याचा दावा केला. या कामांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील भाजपा नेते प्रवीण दरेकर, आमदार सदाभाऊ खोत, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड आदी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाच्या रिपोर्ट कार्डला रेट कार्ड, तर शिवसेने (उबाठा) चे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी यास भाजपाचे डिपोर्ट कार्ड, असे संबोधले आहे. मुंबईत झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही काम केल्यामुळे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्याचे धाडस दाखवत आहोत.
सरकारने खूप काम केले; शिंदे, फडणवीस, अजित पवारांचा दावा | महायुतीचे रिपोर्ट कार्ड
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, आधीचे सरकार रिपोर्ट कार्ड बनवणार का? आणि जर त्यांनी रिपोर्ट कार्ड जारी केले तर ते काय दर्शवतील. कारण त्यांच्या सरकारने केवळ विकास प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम केले होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आव्हानाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही 10% आरक्षण दिले होते. त्याविरोधात न्यायालयाचा दरवाजा कोणी ठोठावला?, आम्ही सारथी संस्थान, महामंडळ दिले. असे असतानाही आम्ही मराठा समाजासाठी काहीच केले नसल्याचा आरोप होत आहे.
फडणवीस म्हणाले, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने
परिवर्तनकारक योजना आणल्या आहेत. आम्ही सर्व योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांसाठी सर्व आर्थिक तरतुदी आणि अर्थसंकल्प तयार केला आहे. एवढेच नाही तर आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सर्वांसाठी काही नवीन योजना आणि लाभांची घोषणा करणार आहोत.