मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरला जाहीर होऊ शकते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अशी माहिती दिली आहे. बुधवारी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची स्क्रीनिंग कमिटीसोबत बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेस स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते.दरम्यान कॉग्रेसच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील जत आ.विक्रमसिंह सावंत व पलूसमधून आ.विश्वजीत कदम या दोन उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या 84 जागा निश्चित
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 215 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. उर्वरित 73 जागांचे वाटपही येत्या तीन दिवसांत निश्चित होणार आहे. निश्चित झालेल्या 215 जागांपैकी काँग्रेसला 84 जागा, तर शरद पवार गट आणि उबाठा गटाला 65-65 जागा देण्यात आल्या आहेत. एक जागा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना देण्यात आली आहे. जे सध्या शिवाजी नगर मानखुर्दचे आमदार आहेत. यावेळी त्यांचा सामना अजित पवार गटाचे नवाब मलिक यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
आघाडीच्या नेत्यांची बैठक
सहा दिवसांनंतर उर्वरित जागा निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईत बैठक घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा स्थितीत आघाडीला उर्वरित जागा लवकरच फायनल कराव्या लागणार आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप म्हणाले, शहरातील 36 विधानसभा जागांपैकी 33 जागांवर आघाडीत एकमत झाले आहे.