विधानसभेच्या मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक २० ते २२ जागा उद्धवसेना लढवेल. १२ ते १३ जागा काँग्रेस, एक जागा समाजवादी पक्षाला, तर एक जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिली जाईल, असा फॉर्म्युला पुढे आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे सध्या १५ पैकी ८ आमदार मुंबईतील आहेत. त्यात आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), संजय पोतनीस (कलीना), सुनील प्रभू (दिंडोशी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), रमेश कोरगावकर (भांडुप), सुनील राऊत (विक्रोळी) आणि प्रकाश फातर्फेकर (चेंबूर) यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे मुंबईत ४ आमदार आहेत. त्यात अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), झिशान सिद्दीकी (बांद्रा पूर्व) आणि असलम शेख (मालाड पश्चिम). वर्षा गायकवाड लोकसभेवर निवडून आल्यामुळे आणि झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्यामुळे या दोन जागा काँग्रेसकडे असून नसल्यासारख्या आहेत. जागा वाटपामध्ये नसीम खान यांच्यासाठी चांदिवली मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंकडून निवडून आलेले मामा लांडे आता शिंदे गटात आहेत. त्याशिवाय वर्सोव्याचा मतदारसंघ काँग्रेसला माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्यासाठी हवा आहे. हे दोन्ही मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेससाठी सोडायची तयारी दर्शविली आहे. वर्सोव्यात उद्धव ठाकरे गटाकडे राजू पटेल, यशोधर फणसे ही दोन नावे आहेत. मात्र, सुरेश शेट्टी यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला दिला जाईल, असे सांगितले जाते.कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर, भायखळामधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार आहेत.
कुलाबा मतदारसंघही उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसकडे या मतदारसंघासाठी अॅड. रवी जाधव, पुरण दोशी, हीरा देवासी असे काही उमेदवार आहेत.यामिनी जाधव यांचा लोकसभेत पराभव झाला. विधानसभेतही शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी भायखळा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांना हवा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे मनोज जामसूदकर, रमाकांत रहाटे, गीता गवळी हे तीन उमेदवार आहेत. ठाकरे गटाने या मतदारसंघासाठी जामसूदकर यांच्यासाठी या जागेचा आग्रह धरला आहे. जोगेश्वरी पूर्वमधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याविषयी शिवसेनेत चर्चा सुरू आहे, तर बांद्रा पूर्व हा मतदारसंघ काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यासाठी देण्याचे मान्य केले आहे. ठाकरे गटाकडून या जागेवर वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचे अंतिम केले आहे.