जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची विटा, तासगावला भेट | विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा घेतला आढावा

0
19

सांगली : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील विटा, तासगाव येथे भेट देऊन निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.विटा येथील भेटीत विटा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम बांदल, विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे, आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे, विट्याचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील आदि उपस्थित होते. तासगाव येथील भेटीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आदि उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, विटा येथे डॉ. राजा दयानिधी यांनी नामनिर्देशनपत्र प्रक्रिया पूर्वतयारीचा आढावा घेतला. तद्नंतर बळवंत महाविद्यालयाच्या इनडोअर स्पोर्टस् फॅसिलिटी सेंटर येथे असलेल्या सुरक्षा कक्ष व मतमोजणी कक्षास भेट देऊन पाहणी केली. तसेच, तासगाव येथे शासकीय बहुउद्देशीय कक्ष या ठिकाणच्या मतमोजणी कक्ष, सुरक्षा कक्षास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी डॉ. राजा दयानिधी यांनी पोलीस विभागास सुरक्षाविषयक सूचना केल्या. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत व सुविधायुक्त ठेवावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सूर्यप्रकाश, रस्ते, विद्युतजोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या घरबसल्या मतदान सुविधेचा तसेच मतदार माहिती चिठ्ठीच्या वाटपाचा आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीची संपूर्ण तयारी करण्यासाठी चांगले नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी या भेटीत दिले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here