तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे बाहेर पडल्याची चर्चा होत आहे. मतदारसंघात एकास एक लढत व्हावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाआघाडीकडून घोरपडेंना पाठिंब्यासाठी गळ टाकला आहे. अद्याप घोरपडे यांनी भूमिका निश्चित केली नाही. मात्र रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील आणि घोरपडे एकत्रित येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील किंवा संजय पाटील असा दुरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राजकारण आणखी एका नव्या नाट्यमय वळणावर येऊन ठेपले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असणार? कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? हे चित्र अद्याप स्पष्ट नाही.
परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार रिंगणात उतरेल असे चित्र आहे. भाजपचे संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दोन्ही नेते एकत्रित येऊन रोहित पाटील यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची शक्यता आहे.
राजकीय पटावर सुरू असलेल्या घडामोडी पाहता संजय पाटील किंवा त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरतील. त्यांना घोरपडे गट पाठिंबा देईल, असे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत.