जत‌ राजकारणातील मुद्दा बदलला,आता भूमिपुत्रासाठी प्रतिष्ठा | भाजपाकडून पडळकर,रवीपाटील कि अन्य कोन ?  

0
37
जत तालुक्यातील कळीचे प्रश्नावर कमी चर्चा व भूमिपुत्राचा‌ मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला ‌जात आहे.एकेकाळी पाण्याभोवती फिरणारे दुष्काळी जतचे राजकारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चक्क भूमिपुत्राच्या मुद्याभोवती फिरू लागले आहे.२००९ ची विधानसभा निवडणूक आठवा. या निवडणुकीत भूमिपुत्राचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा गजर (काँग्रेसने ही जागा इच्छुक जास्त झाल्याने राष्ट्रवादीला दिली होती) सहन न झाल्याने जतच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस विसर्जित करुन काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कमळ हाती घेतले अन् फुलवलेही.
अवघ्या २१ दिवसात प्रकाश शेंडगे जतचे आमदार झाले. तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप यांच निसटता पराभव झाला. तिरंगी झालेल्या या लढतीत जनसुराज्य पक्षाकडून स्व.बसवराज पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले होते. २००९ च्या निवडणुकीत भूमिपुत्रांचा मुद्दा गाजला खरा पण जतकरांनी तो स्वीकारला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर स्थानिक इच्छुकांबरोबरच बाहेरच्या मंडळींनी जतचा आपला दावा सांगण्यास सुरुवात केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी जतमध्ये धुमधडाक्यात काम सुरू केले. कार्यालयही उघडले. विस्तारित म्हैसाळ योजना व गावोगावी निधी देण्याच्च नियोजन आखत झंझावात सुरू केला, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांन थांबण्यास सांगितल्याने त्यांनी पुन्हा मुंबई गाठली.
योगेश जानकर यांच्यानंतर भाजपचे स्टार प्रचारक, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जत विधानसभा मतदारसंघात एन्ट्री झाल्यानंतर पाणी विकासाचा मुद्दा केव्हा गुल झाला कळलेच नाही.भाजपमधील इच्छुक आक्रमक झाले. आ. पडळकर नको म्हणत भाजपमधील इच्छुक नेत्यांनी भूमिपुत्राचा नारा लगावला. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवि पाटील यांनी सर्वात अगोदर आ.पडळकरांना विरोध करत जतमध्ये आ.पडळकर यांची लुडबूड नको म्हणत थेट पक्षाकडे कारवाईचीही मागणी केली. जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तर जाहीरपणे आ.पडळकर यांच्यावर निशाणा साधला.
आटपाडी सोडून जतला तुमचे कान काम,म्हणत विलासराव जगताप यांनी आ. पडळकर यांना सुनावल २०२४ चा आमदार भूमिपुत्रच हवा, त्याचबरोबर भाजपमधील इच्छुक उमेदवारांनी एकमुखी निर्णय नाही घेतला तर पुन्हा काँग्रेसच विक्रमसिंह सावंत आमदार होणार, हे अटळ असल्याचे सांगत जगताप यांनी जणू भाजप इच्छुकांना एक प्रकारे जाहीरपणे इशाराच दिला आहे. भूमिपुत्राचा हा मुद्दा ऐरणीवर आल्याने भाजप पक्षश्रेष्ठी नेमके काय निर्णय घेते, इच्छुक नेमके काय करणार यावर सारे गणित अवलंबून आहे. भाजपचे बेरजेचे गणित चुकले तर जत मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे जाणार असल्याचे चर्चिले जात आहे.
भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच भाजपमधून माजी आमदार विलासराव जगताप, आ. गोपीचंद पडळकर, युवा नेते तम्मणगौडा रवि पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, डॉ. रवींद्र आरळी, शंकर वगरे इच्छुक आहेत जतच्या राजकारणात एका बाजूला भूमिपुत्राचा मुद्दा गाजत असताना दुसऱ्या बाजूला आ. पडळकर यांनी गावनिहाय संपर्क दौरे करून भाजपमधील इच्छुकांची कोंडी करण्याबरोबरच समर्थकांमध्ये उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केल्याने भाजपचे राजकारण चांगलेच तापल आहे. विलासराव जगताप यांनीही आपण इच्छुक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असून आयात उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये बंडखोरी होईल, असा इशारावजा सूचना दिलेली आहे.
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून यशस्वी काम करत असलेले तम्मणगौडा रविपाटील यांनी मुंबई व दिल्ली गाठत उमेदवारीसाठी आपली सर्व ताकद पणाला लावत आपणासच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. जिल्हा बँकेच संचालक प्रकाश जमदाडे हेही माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून भाजपमधून उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार फिल्डींग लावत आहेत. डॉ.रवींद्र आरळी पक्षादेश मानून काम करणार असले तरी त्यांनीही आपण इच्छुक असल्याचे लपविले नाही.
पांरपारिक विकासाचे मुद्दे गायब
जतच्या ६५ गावात आजही म्हैसाळचे पाणी पोहचलेले नाही. निम्मा तालुका यंदा दुष्काळात होरपळला असला तरी जतमध्ये आता विकासाची गरजच नाही, असेच काहीसे चुकीचे चित्र रंगविले जात आहे. विकासाच्या मुद्यावर यंदाची निवडणूक होणे अपेक्षित असताना ही निवडणूक भूमिपुत्राच्या मुद्यावरून गाजत आहे. जर भाजपने आ. पडळकर यांना उमेदवारी दिली तर, भूमिपुत्र हाच मुद्दा कळीचा मुद्दा ठरणार हे उघड आहे. त्यात भाजपमध्ये इच्छुक अधिक असल्याने बंडखोरीची चिन्हे दिसत असल्याने काँग्रेसचा हा गड पुन्हा भाजपला ताब्यात घेताना तारेवरची कसरत करावी लावणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here