वाढते प्रदूषण आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला होता. यंदाही नायालय फटाके फोडण्यासाठी वेळा ठरवून देईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती तेव्हढीशी गंभीर नसली तरी दिवाळीत प्रचंड प्रमाणात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे तशी परिस्थिती उद्भवू शकते हे सुद्धा खरे आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके फोडले जात असतील, तर त्यावर कारवाई करण्याबाबत प्रशासन यंदा काय सिद्धता करणार आहे हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे. दिवाळीनिमित्त फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर नियंत्रण यावे यासाठी दरवर्षी न्यायालय वेळेची मर्यादा आखून देते मात्र मुंबईसारख्या सर्वाधिक प्रदूषित शहरात दिवाळीच्या दिवसांत रात्री १२ वाजल्यानंतरही फटाके फोडले जातात हे वास्तव नाकारून चालणार नाही.
याकडे पोलीस प्रशासनही कोणाची तक्रार येईपर्यंत सोयीस्करपणे कानाडोळा करते. मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये सुद्धा रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जातात. त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशाला प्रशासन किती गांभीर्याने घेते हाही एक प्रश्नच आहे. फटाक्यांच्या आवाजाच्या मर्यादेबाबतही दरवर्षी नियम घातले जातात मात्र दिवाळीत ही मर्यादाही सर्वत्र बिनदिक्कतपणे ओलांडली जाते. दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाण फटाके फोडले जात असल्याने प्रशासन तरी कुठे कुठे लक्ष देणार ? फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होऊन केवळ माणसाच्याच नव्हे तर पक्षी आणि प्राण्यांच्या आरोग्याचेही अपरिमित नुकसान होते. फटाके फोडणे म्हणजे केवळ धनाचाच अपव्यय नव्हे, तर फटाक्यांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जैविक आणि वित्तीय हानी होत असते. क्षणिक सुखाव्यतिरिक्त कोणतेही लाभ नसणारी फटाके फोडण्याची प्रथा ही मुळात भारतीय संस्कृतीचाच भाग नाही. दिवाळी आणि फटाके फोडणे यांचा तर तिळमात्र संबंध नाही. मग या विषवल्लीच्या छोट्या छोट्या फांद्या छाटण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी आणून मुळावरच का घाव घातला जात नाही ?
सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई