विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वार्थी राजकारण्यांना अक्षरशः ऊत आला आहे. सकाळी एका पक्षात, तर दुपारी दुसऱ्या पक्षात, तर उमेदवारी मिळवण्यासाठी रात्री तिसऱ्या पक्षाच्या दारात, अशीच अवस्था स्वार्थी राजकारण्यांची झाली आहे. काही झालं तरी उमेदवारी मिळवून निवडणूक लढवायचीच; असा निर्धार करताना अनेकजण निष्ठा संपवत विचारधाराही गुंडाळून ठेवत आहेत. वडील एका पक्षात, तर तिकिटासाठी मुलाला पाठवायचे दुसऱ्या पक्षात, राजकारणातील या घराणेशाहीने राजकारणात नेमकं काय चाललंय, हाच प्रश्न सर्वसामान्यांसमोर पडला आहे.
सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील चित्र पाहिले, तर ही निवडणूक म्हणजे ‘न भुतो, न भविष्यती’ अशीच होणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीमुळे महायुती व महाविकास कोणीही उठतो आणि पाहायला मिळत आहे.गेल्या निवडणुकीत परस्पर विरोधात लढलेले आज आघाडीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. मात्र, या निवडणुकीत नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची? असा प्रश्नही आघाडीप्रमुखांसह श्रेष्ठींसमोर आहे. स्टँडिंग उमेदवाराला उमेदवारीचा फॉर्म्युला ठरल्याने अनेक मतदारसंघांतील विरोधी उमेदवारांना पक्षांतर हाच पर्याय राहिला आहे. यातूनच अनेकांनी
घरवापसीही केली आहे. सोयीच्या राजकारणासाठी काही राजकारण्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. या पक्षांतराचे त्यांना काहीच वाटत नाही. पक्षनिष्ठा आणि विचारधारा तर नाहीच नाही. असेच अनेकांच्या बाबतीत दिसून येते.
तिकीट नाही, तर कर बंड
काही पक्षांतील उभ्या फुटीमुळे परस्पर विरोधकही सत्तेत एकत्र आले आहेत. म्यान एक, तलवारी अनेक, अशीच अवस्था सध्या राजकारणात दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत तर अनेकांनी अनेक वर्षे ज्या पक्षात घालवली, त्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जावे लागत आहे. एवढेच नाही, तर अनेकांना वरिष्ठांकडूनच तिकीट मिळत नाही, तर कर बंड, जा दुसऱ्या पक्षात असा स्वार्थी सल्लाही दिला जात आहे.
वजीराच्या भूमिकेत अनेकजण
दोन्ही आघाडीतील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळेच सोयीचे राजकारण सुरू आहे. जागा वाटपात कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार, यावरूनही पक्षप्रवेश निश्चित केले जात आहेत. आघाडी अंतर्गत जागा वाटप झाल्यानंतर बुद्धीबळातील वजीराप्रमाणे अनेकजण सर्वपक्षीय मान्यतेने कोणत्याही पक्षात प्रवेश करत आहेत.