अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. त्याला विरोध केल्याने तिचा निघृणपणे खून करून मृतदेह जवळच असलेल्या नदीपात्रात फेकून दिला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. श्वानपथकाच्या मदतीने मृतदेह शोधण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले. उमा महेश पवार (वय ३२, रा चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर) असे खून झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सुभाष बंडू बर्डे (वय २५, ह. मु. चिचोंडी पाटील) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत महेश विठ्ठल पवार यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची पत्नी गावातील मारुतीवाडी येथील मिनी अंगणवाडीत सेविका होत्या. गुरुवारी सायंकाळी घरी आल्या नाहीत. त्यामुळे पतीने अंगणवाडीत जाऊन पाहणी केली. तेव्हा बाहेरून कुलूप होते. आत त्यांना रक्ताचे डाग दिसले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. श्वानपथकाला पाचारण केले. श्वान नदीपात्राभोवती घुटमळत होते. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शोधमोहीम हाती घेत मृतदेह शोधून काढला.