जत : भापजपचे जत विधानसभा निवडणूकप्रमुख तम्मनगौडा रवि पाटील यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने उमेदवारीत भूमिपुत्रांना डावलले आहे. म्हणून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे, असा इशारा रवि पाटील यांनी दिला आहे.
जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्र विरुद्ध उपरा असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भूमिपुत्रांनी त्यांच्या विरोधात आवाज उठविला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जत विधानसभा निवडणूकप्रमुख तम्मनगौडा रवि पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप व अपक्ष म्हणूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रवि पाटील म्हणाले, भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे. भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जतमधून सक्षम भूमिपुत्राला निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच आहे. यामध्ये तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी टिमूभाई एडके, बसवराज पाटील, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, तम्मा सगरे उपस्थित होते.