खा.विशाल पाटील यांचा संजय पाटील यांना टोला : ढवळी येथून रोहित पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ
साधू - बुवांचा नाद असणाऱ्या माणसांनी त्यागाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. पाच वर्षे भावी आमदार म्हणून पोराला फिरवले. मात्र ऐनवेळी तुम्ही उमेदवार झालात. जो पोराचा झाला नाही तो जनतेचा कसा होऊ शकतो, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना लगावला.
तासगाव तालुक्यातील ढवळी येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी खा. पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्यासह तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, बाप नसल्याचे दुःख काय असते हे मला माहित आहे. गेले २१ वर्षे मला जाणीवपूर्वक पुढे येऊ दिले नाही. मात्र लोकसभेला जनतेन निवडणूक हातात घेतली. मी नेत्यांच्या विश्वासावर राहिलो असतो तर मला कावळा शिवायचा राहिला असता. गेल्या दहा वर्षात तुमच्या खासदाराने तासगाव हा शब्द कधी संसदेत उच्चारला नाही.
ते म्हणाले, कालचे भाषण अजित पवार यांनी नेमके कोणासाठी केलं हे मला कळालं नाही. आर. आर. पाटील जाऊन नऊ वर्षे झाली. मात्र आत्ताच त्यांनी हे का बोलले. माणूस गेला की वाद संपतो, ही आपली संस्कृती आहे. मात्र त्यांच्या मुलाला पाडण्यासाठी कोण उमेदवार मिळेना म्हणून जनतेने लोकसभेला नाकारलेला उमेदवार दिला. यातच त्यांचं अपयश आहे.
तासगाव शहराच्या आसपास तुम्ही फिरला तर प्रत्येक सातबाऱ्यावर संजय पाटील यांच्या नावाचा उल्लेख आढळतो. ही गुंडगिरीच आहे. मदत करणाऱ्याच्या मुंडक्यावर ते पहिल्यांदा पाय ठेवतात. याचा अनुभव लवकरच अजित पवार यांना येईल, असेही खासदार पाटील म्हणाले.
यावेळी रोहित पाटील म्हणाले, तासगाव तालुक्याच्या सर्व क्षेत्रात मी काम केले. ३५ वर्षे तुम्ही काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी ३५ वर्षे जनतेने तुम्हाला का नाकारले, हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारावा, असे आव्हान दिले. येत्या पाच वर्षात महिला व तरुणींसाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये कोडींग क्लासेस संकल्पना राबवणार आहे. तसेच मुलींच्या आरोग्यासाठी एच. पी. व्ही. ही लस या मतदारसंघातील मुलींना देणार असून ते देणारा हा मतदारसंघ भारतातील एकमेव असेल.
ते म्हणाले, पाणी योजनांची थट्टा करणारे व पाईपलाईनमध्ये उंदीर खेळतील म्हणणारे आता पाणी पोहोचायच्या आत नारळ घेऊन पाणी पुजायला धावतात. नारळाचे पाणी पुढे गेले. शेतकऱ्याला कमी पण व्हाट्सअपवर पाणी जास्त आले. लोकांची थट्टा तुम्ही केली आहे. एमआयडीसीलाही विरोध तुम्हीच केला. दहा वर्षे तुम्हाला संधी देऊनही बोलला नाही. मी बोलतो म्हणून लोक मला स्वीकारतात.
या मतदारसंघाचे राजकारण फक्त विकासावर होईल, याची काळजी घ्या, असा इशारा त्यांनी दिला. कालच्या सभेत मला 'बाळ' म्हणून संबोधणाऱ्यांनी तुमच्या 'बाळाला' का माघार घ्यावी लागली. पक्ष नेतृत्वाला उमेदवार का बदलावा लागला, हे जनतेला सांगावे, अशी खोचक टीका केली. येत्या पाच वर्षात बाजार समितीची इमारत पूर्ण होईल. त्या ठिकाणी द्राक्षांचे सौदे चालू करणार आहे. तासगाव येथे पाच कोटींची माती, पाणी व काडी परीक्षण करणारी आधुनिक प्रयोगशाळा उभी राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.