मुंबई : आपण सत्तेवर आल्यावर तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी देतो, महामंडळ देतो, अशी आश्वासने देऊन महाविकास आघाडीचे नेते बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. विधान परिषदेच्या राज्यपाल
नियुक्त १२ जागांपैकी ७ जागा महायुती सरकारने नुकत्याच भरल्या आहेत, तर ५ जागा रिक्त आहेत. सरकार आल्यावर या ५ जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन मविआचे नेते देत असल्याची माहिती काही बंडोबांनीच दिली.काँग्रेसमधील बंडखोरांना शांत करण्यासाठी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि ज्येष्ठ नेते अशोक गहलोत प्रयत्न करत आहेत. दिवसभरात या दोन नेत्यांनी मुंबई आणि लगतच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा केल्याचे समजते. तर उद्धव सेनेकडून खा. संजय राऊत, शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे बंडखोरांच्या संपर्कात आहेत.
जिथे मित्रपक्षांविरोधात अधिकृत उमेदवार आहे तिथे कुणी माघार घ्यायची यावर मविआच्या नेत्यांची बैठक होऊन त्यातून हा प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो.
राज्यात महायुतीत अनेक
ठिकाणी बंडखोरांचे पीक आले असून, त्यांना समजावता समजावता ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडाला फेस आल्याची स्थिती आहे. निवडणूक लढण्याबाबत अतिशय गंभीर असलेले बंडखोर कोणाचेही ऐकत नसल्याचे चित्र बुधवारी दिवसभर बघायला मिळाले.
महायुतीची अशी आहे रणनीती..
भाजपच्या उमेदवाराविरुद्ध ज्या भाजपजनांनी बंडखोरी केली आहे असे आणि मित्रपक्षांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अशा दोन्हींसाठी ‘ऑपरेशन समजूत’ राबविली जात आहे. ४ नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दिवाळी असूनही बंडखोरांची मनधरणी करण्यातच महायुतीच्या नेत्यांचा कस लागेल, असे चित्र आहे.
सांगली जिल्ह्यातील स्थिती काय ?
सांगली जिल्ह्यात यंदा बंडखोरांचे पीक जोमात आले आहे. आठपैकी पाच मतदारसंघात विविध पक्षातील अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांनी शड्डू ठोकल्याने पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. उमेदवारी अर्जाची मुदत संपताच मंगळवारी रात्रीपासून बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
जिल्ह्यातील मतदारसंघापैकी पलूस-कडेगाव, तासगाव- कवठेमहांकाळ व इस्लामपूर या तीनच मतदारसंघात बंडखोरी झाली नाही. अन्य पाचही मतदारसंघात बंडखोरीचे झेंडे फडकले आहेत. हे झेंडे उतरविण्यासाठी यापूर्वी फार हालचाली झाल्या नाहीत, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपताच अनेक नेत्यांनी दूरध्वनीवरून बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. येत्या ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यासाठी पाचच दिवसांचा कालावधी उरला आहे.बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी इतके दिवस खूप कमी असल्याने शक्य तितक्या नेत्यांना बंड थोपविण्याच्या कामी जुंपण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत राज्यातील काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बंडखोरांच्या भेटीला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्या मतदारसंघात कोणाची बंडखोरी ?
सांगली: जयश्रीताई पाटील (काँग्रेस), शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे (भाजप) जत : तम्मनगौडा रवी पाटील, प्रकाश जमदाडे (भाजप) शिराळा : सम्राट महाडिक (भाजप) • मिरज: मोहन व्हनखंडे, सी. आर. सांगलीकर (काँग्रेस) खानापूर : राजेंदअण्णा देशमुख (राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्ष),ब्रह्मानंद पडळकर (भाजप)
बंड शांत करण्यासाठी पदे देण्याच्या ऑफर
बडोबांना शांत करण्यासाठी भविष्यात मोठी पदे देण्यापर्यत ऑफर दिल्या जात आहेत.कोणाला महामंडळ, कोणाला विधानपरिषद तर कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाराच्या दोऱ्या देण्याची आश्वासने दिली जात आहेत. या ऑफरना कोणाचा कसा प्रतिसाद मिळेल याचा अंदाज घेतला जात आहे. तरीही ऑफर देऊन बंड शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गटाच्या अस्तित्वाची चिंता चंडखोरी केलेल्या बहुतांश नेत्यांना
पक्षापेक्षा स्वतःच्या गटाच्या अस्तित्वाची चिंता वाटते. काही नेत्यांनी तालुक्याच्या अस्मितेमागून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई पुकारली आहे. जत मतदारसंघातील बंडखोरी वेगळी आहे. याठिकाणी बाहेरचा उमेदवार लादल्याने स्थानिक नेते एकवटले आहेत. काँग्रेस, भाजपमध्ये बंडखोरी अधिक आहे. शरद पवार यांच्या गटाला केवळ खानापुरात बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.