जत: परेल ते जत असा शिवशाही बसने प्रवास करत असताना पावणेपाच लाखांचे दागिने लंपास झाल्याची तक्रार जयश्री बलराम गोफणे (रा. हेदुतणे, ता. पनवेल, जि. रायगड, मूळगाव रा. करेवाडी, ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे.
दि. २८ ते २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान जयश्री गोफणे व त्यांची मुलगी साजिरी हे प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतील सोन्याचे २ लाख किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंथन, सोन्याची साखळी, ४० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, पाच अंगठ्या असा मिळून एकूण ४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला. जत बसस्थानकावर उतरल्यानंतर गोफणे यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळवला. बसमध्ये दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी जत पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले जात आहे.