तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी स्वतःच्या आईचे तिकीट कापले आहे. स्वतःचा हट्ट पुरवून घेण्यासाठी त्यांनी आईचे तिकीट कापताना कोणताही विचार केला नाही. तर दुसरीकडे खासदार विशाल पाटील यांनी स्वतःच्या वहिनी जयश्री पाटील यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतला आहे, असा हल्लाबोल प्रभाकर पाटील यांनी केला.
ढवळी (ता. तासगाव) येथे रोहित पाटील यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी संजय पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. स्वार्थासाठी संजय पाटील यांनी स्वतःच्या पोराला बाजूला ठेवले. भावी आमदार म्हणून त्याला फिरवले होते. पण ऐनवेळी स्वतःच उमेदवारी घेतली. जो पोराचा होऊ शकत नाही, तो जनतेचा काय होणार, अशा शब्दात खा. पाटील यांनी संजय पाटील यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते.
याला प्रत्युत्तर देताना संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत. तिकीटच काय तर त्यांच्यासाठी मी जीवही द्यायला तयार आहे. माझ्या वडिलांवर ज्या - ज्या वेळी टीका करायला तुम्ही पुढे याला त्यावेळी हा प्रभाकर पाटील ढाल बनून खंबीरपणे पुढे उभा असेल.
ते म्हणाले, रोहित पाटील यांनी या निवडणुकीत स्वतःच्या आईचे तिकीट कापले आहे. स्वतःचा हट्ट पुरवून घेण्यासाठी आईचे तिकीट कापणे योग्य आहे का? जे स्वतःच्या आईचे झाले नाहीत, आमदारकीसाठी स्वतःच्या आईला बाजूला सारले, ते जनतेची सेवा काय करणार. केवळ आमदारकीच्या लालसेपोटी स्वतःच्या आईला बाजूला करणे योग्य नाही.
खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही स्वतःच्या वहिणींचा फक्त निवडणुकीपुरता वापर करून घेतला आहे. आता सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी तुम्ही काहीही प्रयत्न केले नाहीत. ज्यावेळी जयश्री पाटील यांना मदत आणि आधाराची गरज आहे, त्यावेळी हे पाय लावून पळत आहेत. ही तुमची नितीमत्ता पूर्ण जिल्हा अनुभवतोय.
ते म्हणाले, विशाल पाटील अपघाताने खासदार झाले आहेत. आजही सांगलीकरांच्या मनात संजय पाटील हेच खासदार आहेत. रोहित पाटील हे महिनाभरापूर्वी प्रचंड कॉन्फिडन्समध्ये होते. आता मात्र ते पूर्णपणे चलबिचल झाले आहेत. त्यांचा पराभव निश्चित आहे. 35 वर्षाच्या निष्क्रियतेला लोक कंटाळले आहेत. यावेळी परिवर्तन अटळ आहे. संजय पाटील आमदार आणि मंत्री होतील यात शंका नाही. तर अजितराव घोरपडेही विधिमंडळात दिसतील. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे.
Home इतर जिल्हे सांगली रोहित पाटलांनी स्वतःच्या आईचे तिकीट कापले | प्रभाकर पाटील यांचा हल्लाबोल :...