‘
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या विरोधात अनेकजण एकवटत आहेत. माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांच्यासह तिसऱ्या आघाडीने रोहितविरोधात मोट बांधली आहे. त्यामुळे या निवडणुकीत रोहित पाटील अडचणीत आल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यादृष्टीने रात्रीचा दिवस केला जात आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात पारंपारिक प्रतिस्पर्धी संजय पाटील व आर. आर. पाटील घराण्यामध्ये 'सामना' होत आहे. येथील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या दोन्ही घराण्यातील टोकाचा, कडवा राजकीय संघर्ष राज्याने पाहिला आहे. मात्र या संघर्षात संजय पाटील यांना कधीच आर. आर. पाटील घराण्याचा पराभव करता आला नाही, हे कटू सत्य आहे.
दरम्यान, दोन्ही गटातील राजकीय संघर्ष मध्यंतरीच्या काळात शमला होता. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर हा संघर्ष कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही घराण्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारली. परंतू या निवडणुकीत संजय पाटील गटाचे अनेक उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले.
त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आर. आर. पाटील कुटुंबाने सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संजय पाटील व आमदार सुमन पाटील यांच्यातील अलिखित राजकीय सेटलमेंटला तडे गेले. दोन्ही गटातील राजकीय संघर्षाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव पाटील यांच्या जिव्हारी लागला.
आर.आर.पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना राजकीयदृष्ट्या मदत करूनही, ज्यावेळी मी अडचणीत आलो, त्यावेळी पहिल्यांदा गळा दाबायला अंजनीचे कुटुंब आले, अशा शब्दात संजय पाटील यांनी आर. आर. पाटील कुटुंबीयांवर घणाघात केला. माझ्या पराभवाला कुठेतरी आर. आर. पाटील घराणे कारणीभूत आहे, अशी धारणा संजय पाटील यांची झाली. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी संजय पाटील गटाने कंबर कसली आहे. गेली 35 वर्षे आर. आर. पाटील घरात असलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. लोकसभेला विरोधात असणाऱ्या अजित घोरपडे यांना आपल्या सोबत घेऊन रोहित पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अजित घोरपडे हे वलयांकित नेतृत्व आहे. त्यांच्या पाठीशी कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुतांशी मतदार आहे. घोरपडे सांगतील ती पूर्व दिशा, अशी भूमिका हे मतदार घेतात. लोकसभा निवडणुकीवेळी याच घोरपडे यांनी संजय पाटील यांना कात्रजचा घाट दाखवला होता. मात्र अजित पवार यांच्या मध्यस्थीने आता दोघांचेही मनोमिलन झाले आहे. त्यामुळे संजय पाटील यांचे पारडे जड झाल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.
दरम्यान, नुकताच संजय पाटील यांचा लोकसभेला पराभव झाला होता. त्यामुळे तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट तयार झाली आहे. अनेक वर्षे आर. आर. पाटील कुटुंबीयांबरोबर संघर्ष करूनही त्यांना यश आले नाही. त्यातच लोकसभेचा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे संजय पाटील यांना एकदा आमदार करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. पाटील यांनीही मला फक्त एकदा आमदार करा, इतिहासात नोंद होईल इतका निधी आणून मतदारसंघाचा विकास करू, असा शब्द दिला आहे.
दरम्यान, रोहित पाटील यांच्या विरोधात अजित घोरपडे यांच्यासह तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातील अनेकजण एकवटत आहेत. तिसऱ्या आघाडीनेही संजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. रोहित पाटील यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोहित यांच्या विरोधात अनेकजण एकवटत असल्याने 'तासगाव - कवठेमहांकाळ'मध्ये रोहित पाटील अडचणीत येत असल्याची चर्चा आहे.
संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी आता रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. युवकांची मोठी फौज मतदारसंघात फिरत आहे. संजय पाटीलही 'घर टू घर' प्रचार करीत आहेत. लोकसभेला झालेल्या चुका टाळून यावेळी प्रचार सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अतिशय 'हायव्होल्टेज' अशी ही लढत पाहायला मिळणार आहे.