राज्यात खरी शिवसेना ठरवणार हे ४९ मतदार संघ | वर्चस्वाच्या लढाईत शिंदे-ठाकरेंच्या उमेदवारांत तुल्यबंळ लढती

0
158

१४ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमने- सामने लढती निश्चित झाल्या आहेत. राज्यातील प्रत्येक निवडणूक भाजप- काँग्रेस यांच्यातच होत असली, तरी यावेळी सत्तेसाठीच्या लढाईपेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असून, विशेषतः मतदारांच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा दावेदार कोण असेल?, हे निश्चित होईल. या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या जागांवर शिंदे आणि उद्धव गटाची मोठी नावे आमने-सामने येणार आहेत; त्या सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. राज्यात किमान ४९ जागांवर थेट स्पर्धेबरोबरच चुरशीची लढत होताना दिसणार आहे. त्यामुळे या भागात निवडणूक रंजक होणार आहे.29 जागावर ‌नेहमी अविभाजित शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.

त्यापैकी १२ मुंबई शहरात आहेत. याशिवाय मराठवाडा आणि कोकण विभागातील प्रत्येकी ८, विदर्भात ६, उत्तर महाराष्ट्रात ४ आणि पश्चिम महाराष्ट्रात ४ जागांवर दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. अशा प्रकारे ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी वैयक्तिकरित्या आणि शिवसेनेसाठी (उबाठा) अग्निपरीक्षा असेल. यामध्ये उद्धवांना स्वतःला प्रस्थापित करण्याची आणि ते आपल्या वडिलांच्या राजकीय वारशाचे खरे वारसदार असल्याचेही सिद्ध करण्याची संधी आहे. यासोबतच महाविकास आघाडी (मविआ) सत्तेत आल्यास हे निकाल मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावतील.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी समान संधी आहेत. बंडखोरी करताना त्यांच्यासोबत आलेल्या ४० जागा तरी त्यांना जिंकायच्या आहेत. मात्र ठाकरे गट ८९ तर शिंदे गट ८० जागांवर लढत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष १३ जागांवर आमनेसामने आले होते. त्यापैकी उद्धव गटाने ७, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेने ६ जागा जिंकल्या.

विधानसभा निवडणुकीत एमएमआर क्षेत्रात प्रमुख लढती पाहायला मिळणार आहे ज्यात गण्यातील कोपरी पाचपाखडी येथील हाय-प्रोफाइल लढतीचाही समावेश आहे. येथे शिंदे यांचा सामना त्यांचे दिवंगत राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होईल. केदार दिघे यांना शिवसेनेने (उबाठा) उमेदवारी दिली आहे. मुंबईतील वरळीमध्ये उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे व राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्यात सामना होत आहे. माहीममध्ये सेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर हे उबाठाचे महेश सावंत यांच्या विरोधात लढत आहेत. येथे मनसेचे अमित ठाकरे हा मोठा चेहरा आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला शहरातील तीन लोकसभा जागांपैकी केवळ एक जागा जिंकता आल्याने शिंदे यांच्यासाठी मुंबई हे आव्हान असेल. उबाठाने मुंबई दक्षिण, दक्षिण मध्यमध्ये विजय मिळवून येथे आपले वर्चस्व कायम राखले होते. शिंदे सेनेला अवघ्या ४८ मतांनी मुंबई उत्तर पश्चिम जागा जिंकण्यात यश आले.

कोकण उद्धवांसाठी आव्हानच 

शिवसेनेसाठी कोकण पट्टाही महत्त्वाचा आहे.कारण हा भाग शिवसेनेचा अविभाजित आधार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा (उबाठा) येथे पूर्णपणे सफाया झाला आणि त्यांनी पाचही जागा गमावल्या. कोकणातील कुडाळ मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे हे शिंदे गटाच्या तिकिटावर विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. राणे कुटुंबाचे कट्टर विरोधक असलेले राज्यमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे अनुक्रमे रत्नागिरी आणि राजापूरमधून सेनेचे (उबाठा) बाळ माने आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

मराठवाडा हा एकेकाळी अविभाजित शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. येथे. अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट आणि संतोष बांगर हे अनुक्रमे संभाजी नगर पश्चिम आणि कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांविरुद्ध लढणार आहेत. विदर्भात शिवसेनेचे दोन मंत्री रिंगणात आहेत. तानाजी सावंत हे शिवसेनेचे (उबाठा) राहुल पाटील यांच्या विरोधात परांडामधून, तर संजय राठोड हे दिग्रसमधून उद्धव यांच्या पक्षाचे पवन जयस्वाल यांच्या विरोधात रिंगणात आहेत. उत्तर महाराष्ट्रात पाचोरा येथे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि उद्धव गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी (चुलत बहीण) यांच्यात जोरदार लढत होणार आहे. मालेगावमध्ये राज्यमंत्री दादाजी भुसे आणि उद्धव गटाचे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांच्यात लढत होणार आहे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here