नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात विकलेल्या पाच तरुणींची सुटका | दोघींच्या पतीनेच विकल्याचे प्रकार

0
221

चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने पुण्यात आणून वेश्याव्यवसायाला लावलेल्या पाच तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने गुरुवारी (दि. ७) सुटका केली. या तरुणींपैकी दोघींना त्यांच्या पतीने वेश्याव्यवसायाला लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ; मूळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना मॅनेजर विक्रम आसीम बिश्वास (वय २३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), विकास उजल मंडोल (वय २१), टॉनी युनुस मुल्ला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम हेगडे, रेश्मा तुपकर, सीमा आरोळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संगीता जाधव, हवालदार रेश्मा कंक व त्यांच्या पथकाने छापा घालून या तरुणींची सुटका केली. एक तरुणी चांगल्या नोकरीच्या आमिषाला भुलून पाच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून या वस्तीत आल्याची माहिती तपासात पुढे आली.दुसरी तरुणी मुंबईत घरकाम करीत असे. 

जादा पैशांचे आमिष दाखवून तिला या वस्तीत विकण्यात आल्याची माहिती निष्पन्न झाली. तिसऱ्या तरुणीला जयपूरहून आणण्यात आले. तर, चौथ्या तरुणीला तिचा पती टॉनी याने कुंटणखाना चालिकेला सांगून वेश्याव्यवसायाला लावले होते. आरोपी विशाल मंडोल याने पश्चिम बंगालमधील १९ वर्षांच्या तरुणीबरोबर लग्न केले. त्यानंतर तो तिला गावाहून पुण्यात घेऊन आला व तिला वेश्या व्यवसायाला लावले, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here