जत,संकेत टाइम्स : गत अठरा वर्षांपासून भारतीय जनता पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून फसवत आहे. वेगवेगळे नेते पुढे करून समाजाला संभ्रमित करण्याचा प्रकार सराईतपणे सुरू आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी 31 मे 2021 रोजी त्यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड, जि.अहमदनगर) येथे आरक्षणाचा जागर या नावाखाली भाजपच्यावतीने आंदोलनाची नौटंकी केली जाणार आहे. यावेळी चौंडीतील अहिल्यादेवींचे जन्मस्थान परिसराबरोबरच त्यांचे विचार आणि प्रतिष्ठेचे संरक्षण प्रशासनाने करावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी चोंडीत 31 मे रोजी आरक्षणाचा जागर करणार असल्याचे सोशल मिडीयावरून जाहीर केले आहे. त्यासंबंधाने प्रशासनाने पुरेशी काळजी घ्यावी, अशी मागणी ढोणे यांनी जामखेडचे तहसिलदार आणि पोलिस निरीक्षकांना भेटून केली.गेले चौदा महिने संपुर्ण देश कोरोना विरोधात लढत असताना पडळकर हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून तणाव निर्माण करत आहेत. सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये जेजुरीमध्ये झालेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उद्धघाटनाच्या कार्यक्रमात धुडगूस घातला. अहिल्यादेवींच्या पुतळ्याची त्यांनी अवहेलना केली. तेथील गुन्ह्यात पडळकर हे आरोपी आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
स्टंट करण्यात पटाईत असलेल्या पडळकर यांनी धनगर समाजाची वेशभुषा वापरून वादंग माजवला आहे. या अनुषंगाने चोंडीत गडबड करण्याचा प्रकार घडू शकतो. स्वत:च गोंधळ माजवून प्रशासनाला वेठीस धरले जावू शकते. सोशल मिडीयाचा यासाठी वापर केला जावू शकतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी ढोणे यांनी केली.