जत विधानसभा निवडणूक, कशी,कुठे,कोणत्या‌ मुद्यावर वळली,वाचा नेमके काय काय घडले..?

0
1186

जत : जत विधानसभेची निवडणूक अंतिम टप्यात पोहचली असतानाच प्रचार शिगेला ठेपला आहे. भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे जातीच्या व्होट बँकेवर निवडणूक केंद्रित झाली. त्यातच लिंगायत समाजावर आक्षेपार्ह पोष्ट, धर्मगुरुंवर हल्ला झाल्याचा आरोप अशा घटनांनी राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. वास्तविक तालुक्याचा विकासाचा अजेंडा देणाऱ्या मंडळींची अवस्था दुष्काळ अटला, विस्तारित विरली अन निवडणूक जातीपातीत अडकली अशी झाली आहे.

जत कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरचा. १२५ खेडी आणि २५० हून अधिक वड्यावस्त्या असणारा दुष्काळी तालुका. विधानसभेच्या निवणुकीचा नंबरही शेवटचा असला तरी येथील प्रत्येक निवडणूक या ना त्या कारणाने राज्यात चर्चेत रहाते. आजवर अंतर्गत धुसफ स, बंडखोरी, पक्ष विसर्जित अशा घटनांनी विधानसभेच्या निवडणुका घागधगत्या राहिल्या आहेत. राज्यकर्त्यांच्या अनास्थेमळे विस्ताराने मोठा असणारा हा तालुका विकासापासून कोसो दूर राहिला. साधारणपणे १९८८ पासून म्हणजे ३५ वर्षे दृष्काळ, कारखाना आणि म्हैसाळचे पाणी हा मुद्दा निवडणुकीत कळीचा बनला आहे. पण निवडणुका आल्या की हा कळीचा मुद्दा गायब होतो अन निवडणूक गाजते.वेगळ्याच मुद्यांनी.

२०२४ ची निवडणूकही भूमिपुत्र आणि उपन्ऱ्या उमेदवार या मुद्यांवर गाजत आहे. वास्तविक जत मतदार संघाचा विचार केल्यास १९९९ पर्यंत हा मतदार संघ आरक्षित होता. १९६२ साली पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने बॅ. टी. के. शेंडगे यांच्या रूपाने उपरा उमेदवार दिला. त्यावेळी जातीपेक्षा काँग्रेस मतांच्या गट्यावर बॅ. शेंडगे निवडून आले. त्यानंतर २००४ पर्यंत भूमीपत्रांनीच विधानसभेचे मैदान गाजवले. या कालावधीत १९९५ चे अपक्ष मधुकर कांबळे यांचा अपवाद वगळता उमजीराव सनमडीकर तीन वेळा, शिवरुद्र टी बामणे आणि जयंत ईश्वर सोहनी दोनवेळा विधीमंडळात गेले. प्रस्थापितांचे विशेषतः काँग्रेसचा वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादीततून भाजपमध्ये प्रवेश करून विलासराव जगताप यांनी २००४ विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडेच्या रूपाने उपरा उमेदवार निवडून आणला.

२००९ साली प्रथमच मतदारसंघ खुला झाला. येथील जागा काँग्रेसकडून खेचून घेवून राष्ट्रवादीने विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेले तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी जगतापाची तालुक्यावर असलेली पक्कड ढिली करण्यासाठी काँग्रेसचं विसर्जित केली. अवघ्या २१ दिवसात भाजपने उभा केलेला उपरा उमेदवार प्रकाश शेंडगे यांना आमदार केले. अशा प्रकारे तीन वेळा बाहेरच्या लोकांनी तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले.आहे. त्यांना भाजप, काँग्रेसच्या नेत्यांची साथ मिळाली आहे हे ही तितकेच खरे.

जातीपतीच्या राजकारणात अडकली यंदाची निवडणूक २०२४ च्या विधानसभा निवडणुकी तिरंगी होत आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर, काँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार तम्मणगौडा रविपाटील यांच्यात लढत आहे. या मतदार संघात १ लाख ५२ हजार ४०९ पुरुष, तर महिला १ लाख ३८ हजार ९५१ असे मतदार आहेत.

सर्वात जास्त लिंगायत समाजाचे ९७ हजार, धनगर समाजाचे ६५ हजार तर मराठा समाजाचे २० हजार मतदान निर्णायक आहे. जातीच समीकरण पाहता भाजपने गोपीचंद पडळकर याना उमेदवारी देताच जातीचा मुद्दा मुद्दा ऐरणीवर येणार असे संकेत होते. या निवडणुकीत दुष्काळ, म्हैसाळ व विस्तारित पाणी योजना या विकासाच्या मुद्यावर होणे सर्वसामान्यांच्या अपेक्षित होतं.

मात्र प्रचारच्या पहिल्या टप्यात विलासराव जगताप यांच्या भूमिपुत्र आणि उपरा या मुद्यावरच प्रचार रंगला. मात्र हळूहळू उमेदवारांनी आपल्या जातीच्या व्होटबँकेवर लक्ष केंद्रित केल्याने जातीच फॅक्टर ऐरणीवर आलं. जातीच्या गणिताची मांडणी सुरू असताना उमदी येथील जाहीर सभेच्या लाईव्ह प्रेक्षपणावर पडलेली आक्षेपार्ह पोष्ट आणि लिंगायत धरगुरूवरील हल्ल्याचा आरोप यामुळे जातीच्या पॅक्टरची धार अधिकच तीक्ष्ण झाली आहे.

भाजपचे बंडखोर उमेदवार गोपीचंद पडळकर यांची धनगर समाजाचे लढाऊ नेते म्हणून ओळख आहे. भाजपचे बंडखोर तम्मनगौडा रवी लिंगायत समाजच युवा नेतृत्व आहे. यांच्या विरोधात विक्रम सावंत मराठा असले तरी सर्व समावेशक नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. या नेत्यांची अवस्था दुष्काळ अटला, विस्तारित विरली अन निवडणूक जातीपातीत अडकली अशी अवस्था झाली आहे. आता येथील सूज्ञ मतदार कोणाच्या पाठीशी राहतात हे येणारा काळच ठरवेल.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here