सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी तटस्थ रहायला हवे होते, मात्र त्यांनी त्यांनी बंडखोरांचा उघड प्रचार केला. लोकसभेला मी त्यांना केलेल्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवली नाही. खा. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली हा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यास दादांच्या वारसदारांनीच हातभार लावला. त्यांच्या घरातील एका महिलेने सांगलीत बंडखोरी केली. अशा वेळी खा.पाटील यांनी तटस्थ रहायला हवे हाते. मात्र माझ्या विरोधात उघड भूमिका घेत त्यांनी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांच्या प्रचार शुभारंभ, सांगता सभेला जाहीरपणे ते व्यासपीठावर गेले. भाषणं केली.त्यांचे सगळे माजी नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे प्रचार करत होते. माजी मंत्री प्रतीक पाटील बॅक ऑफिस सांभाळत होते. पत्रकार परिषदा घेत होते.
डिपॉझिट जप्त झाले, काय साध्य झाले ?
पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्री पाटील यांनी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी त्यांच्याशी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय, राज्य पातळीवर वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. त्यांना माघार घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्यांचे न ऐकता बंडखोरी केली. त्यांना कमी मते पडली. डिपॉझिट जप्त झाले, याने काय साध्य झाले? त्या लढल्या नसत्या तर झाकली मूठ सव्वालाखाची राहिली असती.