किरकोळ कारणातून झालेल्या वादातून शहरातील एका वेटरचा चाकूने शैलेश राऊत भोसकून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या सावंत प्लॉट परिसरात घडली. शैलेश कृष्णा राऊत (वय २६, मूळ रा. बेनीखुर्द, ता. लांजा, रत्नागिरी, सध्या रा. पारिजात कॉलनी, सावंत प्लॉट) असे वेटरचे नाव आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या बारा तासाच्या आत एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसह अन्य दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी खून प्रकरणी संशयित सुमित संतोष मद्रासी (वय २३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) आणि सौरभ बाबासाहेब कांबळे (२२, त्रिमुर्ती कॉलनी, सांगली) अशी त्यांची नावे आहे. किरकोळ कारणाच्या वादातून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शैलेश राऊत हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील आहे. तो सांगलीतील ओम फुडस् हॉटेलमध्ये मागील काही महिन्यांपासून वेटर म्हणून कार्यरत आहे. संशयित सुमित मद्रासी, सौरभ कांबळे व अल्पवयीन विद्यार्थी आणि शैलेश राऊत हे एकमेकांचे मित्र आहेत. संशयित काल शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये मद्य प्राशन करण्यासाठी गेले होते. तेथून काही वेळाने ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन शेजारील खुल्या जागेत येवून थांबले. हॉटेलमधील काम संपल्यावर रात्री नऊच्या सुमारास शैलेश हा त्याठिकाणी आला. चौघांनी पुन्हा मद्य प्राशन केले. त्यावेळी चौघांत किरकोळ कारणावरुन वाद झाला.
त्यातून चिडलेल्या शैलेश याने स्वतः जवळ आणलेला चाकू काढला. मात्र त्याचवेळी संशयित तिघांनी त्याच्याकडून चाकू काढून त्यांच्याकडे घेतला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत संशयिताने शैलेश याला त्याच्याच चाकूने भोकसले. शैलेश खाली कोसळल्यावर संशयित तेथून पसार झाले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, काही वेळातच ही बाब विश्रामबाग पोलिसांना समजताच निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांचेही पथक दाखल झाले. तातडीने दोन पथके करुन हल्लेखोरांच्या शोधार्थ पाठविण्यात आली.
खोलवर दोन वार
किरकोळ वादातून हा खून करण्यात आला. ज्याचा खून झाला त्या शैलेश राऊत याने स्वतःच्या खिशातून चाकू आणला होता. वाद झाल्यानंतर त्याने चाकू काढून संशयितांवर उगारला. त्यामुळे हल्लेखोर संशयितांनी झटापट करुन शैलेशकडील चाकू काढून घेतला आणि एका संशयिताने शैलेश याच्या छातीत आणि पोटात दोन वार केले. घाव वर्मी बसल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने शैलेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.