जत : जतसारख्या दुष्काळी पट्ट्यात स्केटिंग म्हटलं की, नक्की भुवया उंचावल्या जाणार, ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा स्केटिंग हा खेळ बहुतांश जतकरांना माहित नाही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्केटिंगचा व जतकरांचा जणू काही संबंधच नाही. शालेय स्तरावर हा खेळ आपल्याकडे नसल्याने सारेच अनभिज्ञ आहे पण याच खेळात आपले भविष्य घडविण्यासाठी धडपडतेय जत तालुक्यातील मेंढेगिरी येथील रचना राजू ऐवळे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत रचनाने बाजी मारली असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेतील निवड झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजू ऐवळे यांची कन्या रचना ही जत येथील एसआरव्हीएममध्ये आठवीत शिकते. वडील राजू व आई श्रीदेवी यांचे तिला कायम नवनवीन शिकण्यासाठी पाठबळ असते. रचनाने स्केटिंग या खेळामध्ये प्राविण्य मिळविण्याचा मानस व्यक्त केला त्याला साथ दिली ती आई-वडिलांनी. जत येथे मागील आठ वर्षांपासून एकमेव अभय बल्लारी हेच स्केटिंगचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या क्रिएटर्स डान्स अँड स्केटिंग अकॅडमीमध्ये रचनाने प्रवेश घेतला अवघ्या आठ महिन्यात तिने मेहनत करत स्केटिंगची ही कला चांगलीच अवगत केली आहे. नुकतेच सांगली येथे अथलॅटीक फेडरेशनच्यावतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत जत येथील क्रिएटर्स डान्स अँड स्केटिंग अकॅडमीच्यावतीने अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १४ ते १७ वयोगटामध्ये रचनाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या रचना ऐवळेची मुंबई खोपोलो येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
रचनाचे यश कौतुकास्पद
मागील आठ वर्षांपासून आपण जतमध्ये मुलांना डान्स बरोबरच रोलर स्केटिंगचे प्रशिक्षण देतो. या खेळात जतमधील अनेक विद्यार्थ्यांनी वश गाठले आहे त्यात प्रामुख्याने सितेज मोरे, उत्कर्ष मंगोजी, कार्तिक चौगुले, कौत्सुक चौगुले, कार्तिक गरड, युक्ता आरळी, मनीष चौधरी यांचा उल्लेख करावा लागेल. अवघ्या आठ महिन्याच्या प्रशिक्षणात रचना ऐवळे हिने स्केटिंगमध्ये जिल्ह्यात क्रमांक पटकावला असून तिची कामगिरी कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.
– अभय बल्लारी, प्रशिक्षक
वेगळे करण्याच्या जिद्दीतून मिळाली प्रेरणा
स्केटिंग हा खेळ मोबाईलवर पाहिला व आवडला. आपणही हा खेळ शिकावा त्यात यश मिळवावे असे वाटले. वेगळे करण्याच्या जिद्दीतून प्रेरणा मिळाली. आई, वडिलांची साथ, प्रशिक्षक अभय बल्लारी यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यात यशस्वी झाले असून राज्यातही क्रमांक पटकावण्याचे ध्येय असल्याचे रचना ऐवळे हिने सांगितले
– रचना ऐवळे,स्केटिंग खेळाडू