जत : आमदार म्हणून नव्हे तर मी श्री यल्लमादेवीचा भक्त म्हणून कोणतीही अडचण आल्यास सांगावी. तसेच यात्रा समिती व प्रशासनाने मिळून यात्रा यशस्वी करावी. यात्रेला येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी यात्रा समिती व प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमादेवीची यात्रा २६ ते ३० डिसेंबरपर्यंत होणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने देवस्थानच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार, तुकाराम बाबा महाराज, श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दुलराजे डफळे व सर्व पदाधिकारी, महावितरण, आरोग्य विभाग, एक्साईज विभाग, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
जतची ग्रामदेवता व श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या यल्लमादेवी यात्रेचा २६ डिसेंबररोजी गंध ओटीने प्रारंभ होणार आहे. २७ रोजी देवीस महानैवेद्य, तर, २८ रोजी देवीची नगर पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर किच होणार आहे.
आमदारांनी केली पालखी मार्गाची पाहणी
बैठक संपल्यानंतर आमदार पडळकर यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या मार्गावर काही शेतकऱ्यांची शेती व लोकवस्ती आहे. तरीही पालखी मार्गासाठी सर्वानुमते योग्य मार्ग काढून रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची ग्वाही आमदार पडळकर यांनी दिली.