तासगाव : तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या विशाल सज्जन फाळके याला 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. याप्रकरणी विशाल फाळके याच्या टोळीतील अन्य साथीदारांची ओळख पटली आहे. मात्र ते फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.वायफळे (ता. तासगाव) संजय दामू फाळके व विशाल सज्जन फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहे. या वादातूनच विशाल फाळके याने गुरुवारी सायंकाळी संजय फाळके, जयश्री फाळके, रोहित फाळके, आदित्य साठे, आशिष साठे, सिकंदर शिकलगार यांच्यावर तलवार, कोयत्याच्या सहाय्याने खुनी हल्ला केला. हा हल्ला करण्यासाठी विशाल याने पुणे भागातील आपली गुन्हेगारांची टोळी आणली होती.
दरम्यान, हल्ल्यातील जखमी रोहित फाळके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर भिवघाट व मिरज येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विशाल फाळके यांच्यासह टोळीने धूम ठोकली. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके ठिकठिकाणी तपास करत होती.
अखेर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला विशाल फाळके याला बेड्या ठोकण्यात यश आले. अवघ्या 24 तासात पुणे येथून फाळके याच्या मसक्या आवळल्या. त्याला आज तासगाव येथील न्यायालयासमोर उभे केले असता 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
दरम्यान, विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव व पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये पुणे येथील एका खंडणी प्रकरणामध्ये विशाल फाळके यांच्या गुन्हेगारी पर्वाला सुरुवात झाली.पुण्यातील गुंडाच्या टोळीत तो काम करत होता. तो मोक्कामधील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
वायफळे येथील खून प्रकरणात त्याने पुणे येथील टोळीचा वापर केला. पुणे भागातून त्याने आपल्या साथीदारांना वायफळे येथे आणले होते. दरम्यान, विशाल फाळकेच्या साथीदारांची तपासात ओळख पटली आहे. मात्र सर्वच गुन्हेगार सराईत आहेत. सध्या ते भूमिगत आहेत. त्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.