जत :यल्लू आईचा उदो उदोच्या जयघोषात लाखो भाविकांनी देवीचा गंध नेसून दर्शन घेतले.लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री.यल्लमादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेस आज गुरूवारपासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून आज यात्रेच्या पहिल्या गंधोटगीच्या दिवशी लाखो भाविक भक्तांनी गंध नेसून देवीचा नवस फेडला.
आज गुरुवारी पहाटे देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी व श्री.स्वप्नील कोळी यांनी श्री.यल्लमादेवीची अभिषेक पूजा करून देवीची खणानारळाने ओटी भरली.त्यांनंतर देवीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
आपल्या शरिराच्या व्याधी व रोग दूर व्हावेत,आपल्यावर देवीची कायम कृपा रहावी यासाठी ज्या भाविक भक्तांनी देवीला साकडे घातलेले होते ते लोक आपला नवस फेडण्यासाठी आज आले होते.
श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान ने यात्रेत नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी कृत्रीम पद्धतीने स्नानकुंडे बांधली आहेत.पुरूषांसाठी व स्त्रीयांसाठी अशी दोन स्वतंत्र स्नानकुंडे तयार करून त्यामध्ये पाणी सोडले आहे.
भाविकभक्त या स्नानकुंडात स्नान करून हातपाय ओले करून श्री.यल्लमादेवी मंदिर परिसरात बसलेल्या जोगतीणींकडून गंध लावून घेऊन व लिंबाचा डहाळा कमरेला बांधून घेऊन देवीच्या मंदिरासभोवती पाच प्रदक्षीणा काढून त्यानंतर देवीचे दर्शन घेऊन आपला नवस फेडताना दिसत होते.
आज देवीचा गंधोटगीचा दिवस असल्याने सकाळपासून हजारो भाविक भक्त देवीचा नवस फेडून देवीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते.
भाविकभक्तांना चांगल्या प्रकारे देवीचे दर्शन घेता यावे यासाठी सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीने मंदिर परिसरात बॅरेकेटींग लावून चांगली सोय केल्याने भाविकभक्तांना चांगल्या प्रकारे देवीचे दर्शन होत आहे.
श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी यात्राकरूंसाठी फिरते शौचालप,पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्याचप्रमाणे यात्रा चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी आर.आर.काॅलेज जत चे एन.सी.सी.विद्यार्थी,पंढरपूर येथील ५० तरूणांची खासगी सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे.
यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
श्री.यल्लमा देवीची यात्रा मोठ्याप्रमाणात भरविण्यात आली असून यात्रेत पंढरपूर येथील मेवामिठाई चे व्यापारी खंडागळे बंधू यांच्यासह विविध व्यवसायाचे हजारो स्टाॅल लागले आहेत.
यात्रेत मौत का कुवा याबरोबरच आकाशी पाळणे,जहाज ,लहान मुलांसाठी वाटर बोटिंग, व विविध प्रकारची मनोरंजनाची साधने आली आहेत.
सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यामार्फत यात्रेत कृषीप्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचा लाभ यात्रेकरूनी घेण्याचे आवाहन सांगली कृषीउत्पन्न बाजार समीतीचे सभापती श्री.
सुजय शिंदे यांनी केले आहे त्याच प्रमाणे जत बिळूर रस्त्यावर बाजार समितीच्यावतीने जनावरांचा मोठा बाजार भरविण्यात आला आहे.जतची ही यात्रा खिलार जातीच्या जनावरांसाठी म्हणून प्रसिद्ध असून बाजार समीतीच्यावतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्ववस्था करण्यात आली आहे.या जनावरांच्या बाजारात मोठ्याप्रमाणात जनावरे विक्रीसाठी आल्याने यात्रेत जनावरे बाजार खरेदी विक्रतून कोट्यावधी रूपायांची उलाढाल होत आहे.
शुक्रवारी श्री.यल्लमादेवीच्या यात्रेचा महानैवैध्य चा दिवस असून जत संस्थानच्या वतीने श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यातून वाजत गाजत दुपारी बारावाजता देवीला नैवेद्य दाखविला जातो.