जत तालुक्यात शेतीसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागताच म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.अशातचं या योजनेचे आवर्तन कधी सुरू होणार,विस्तारित म्हैसाळच्या कामाची प्रगती याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजना,म्हैसाळ अवर्तनासह विकास कामांच्या योजना आणि प्रत्यक्ष कार्यवाहीचे विस्तृत वर्णन केले.मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नसून, पक्षासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जतच्या ६५ गावासाठी असणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी सध्या ५०० कोटीची गरज असून मी ते शासनाकडे मागणी करणार आहे.सध्या विस्तारित योजनेच्या बेंळकी येथील पहिल्या पंपहाऊसचे काम सुरू आहे.ते काम म्हैसाळ योजनेच्या कँनॉल लगत आहे.त्यामुळे आवर्तन सुरू झाले तर पाण्यामुळे पंपहाऊसमध्ये सहा महिने काम थांबू शकते त्यामुळे म्हैसाळचे आवर्तन १५ जानेवारी नंतर सुरू करा असे मी अधिकाऱ्यांना सांगितल्याचेही आ.पडळकर म्हणाले.
सध्या म्हैसाळ आवर्तन सुरू करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.मात्र विस्तारित योजनेचे काम थांबू नये यासाठी अवर्तनसाठी थोडा अवधी लागणार आहे.बेंळकी पंपहाऊचे काम एकदा पायाच्या वर आले की पाणी सुरू होईल.तालुक्यातील सर्व गावांना पाणी देण्याचे मी वचन पुर्ण करणार असेही पडळकर म्हणाले.