राष्ट्रवादीत राहून भाजपची सदस्य नोंदणी?

0
3

‘तासगाव – कवठेमहांकाळ’मध्ये संजय पाटील यांना पुन्हा भाजपचे वेध?

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपबरोबर 'घटस्फोट' घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून त्यांचे कुंकू कपाळी लावले. मात्र हा संसार अवघ्या तीन-चार महिन्यात विस्कटण्याचे संकेत आहेत. संजय पाटील सध्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे इथे मन रमत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने राष्ट्रवादीत राहून भाजपची सदस्य नोंदणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीत राहून भाजपच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करून संजय पाटील गटाने अजित पवारांशी गद्दारी केल्याचे बोलले जात आहे. पाटील यांना भाजप प्रवेशाचे वेध लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट दिसत आहे.

    सांगली लोकसभेला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून संजय पाटील यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर पाटील यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले होते. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातही त्यांच्या गटाची मोठी पडझड झाली होती. त्यामुळे स्वतःचे व गटाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अगोदर स्वतःचा मुलगा प्रभाकर यांचे नाव विधानसभेसाठी चर्चेत होते. मात्र ऐनवेळी संजय पाटील यांनी स्वतः शड्डू ठोकत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

    महायुतीच्या जागा वाटपात तासगाव - कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली. त्यामुळे संजय पाटील यांना भाजप सोबतचा संसार मोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याखेरीज पर्याय नव्हता. त्यांनी भाजपशी काडीमोड घेतला. राष्ट्रवादीचे कुंकू माथ्यावर लावले. मात्र विधानसभा निवडणुकीतही संजय पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

    अखंड निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना 'बाळ' म्हणून हिणवले. मात्र याच बाळाने संजय पाटील यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर संजय पाटील, चिरंजीव प्रभाकर पाटील व त्यांचा गट विजनवासात गेल्याचे दिसत आहे. विधानसभेला झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीकडून संजय पाटील यांना महामंडळ किंवा विधानपरिषद मिळण्याची आशा होती. मात्र अनेक दिग्गज 'वेटिंग'वर असल्याने त्यांना सध्या तरी कोणतीच संधी मिळेल, असे वाटत नाही.

     परिणामी संजय पाटील यांची राजकीय घुसमट सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये त्यांचे मन रमेना झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. सद्यस्थितीत तरी संजय पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे भाजपमध्ये आहेत. ते तासगाव - कवठेमहांकाळचे निवडणूक प्रमुख आहेत. 

     सध्या देशभरात भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे. सुरुवातीच्या काळात प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांच्या गटाने या सदस्य नोंदणीकडे पाठ फिरवली होती. मनेराजुरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय प्रारंभिक वर्गाकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नव्हते. दरम्यान, भाजपच्या जुन्या - नव्या पदाधिकाऱ्यांनी तासगाव - कवठेमहांकाळमध्ये सदस्य नोंदणी सुरू केली.

   भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील, महेश पाटील, गोविंद सूर्यवंशी, इंद्रनील पाटील, महेश पाटील, नाना गोसावी, संदीप सावंत, शितल पाटील यांच्यासह अनेकांनी सदस्य नोंदणी सुरू केली. या अभियानाच्या विविध वृत्तपत्रांमधून बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर प्रभाकर पाटील व त्यांच्या गटाला आपण भाजपमध्ये असल्याची व कमळाबाईची आठवण झाली.

    संजय पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत भाजपची सदस्य नोंदणी करण्याची सूचना त्यांनी दिल्याचे समजते. मुळात सद्यस्थितीला संजय पाटील राष्ट्रवादीत आहेत. तरीही त्यांचा गट भाजपची सदस्य नोंदणी करत असेल तर ती अजित पवार यांच्याशी गद्दारी ठरणार आहे. वास्तविक संजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

   अजित पवार यांनी विधानसभेसह आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संजय पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र निवडणूक संपताच संजय पाटील यांच्याकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीत राहून भाजपची सदस्य नोंदणी करण्याचा होत असलेला प्रयत्न अजित पवार यांच्याही कानावर गेल्याचे समजते. परिणामी येत्या काही दिवसात संजय पाटील गटात उलथापालती होण्याचे संकेत आहेत.

‘कोणाच्याही’ माध्यमातून झालेली सदस्य नोंदणी आमच्यासाठी महत्वाची : संदीप गिड्डे – पाटील

   तासगाव - कवठेमहांकाळमध्ये संजय पाटील गट राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपची सदस्य नोंदणी करत आहे. याबाबत भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'सद्यस्थितीत देशभरात भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे. पक्ष बळकट करणे ही आमची प्राथमिकता आहे. तासगाव -  कवठेमहांकाळमध्ये आम्ही सुरुवातीपासूनच सदस्य नोंदणी सुरू केली आहे. प्रभाकर पाटील हे तासगाव - कवठेमहांकाळचे निवडणूक प्रमुख आहेत. त्यांच्याही माध्यमातून सदस्य नोंदणी सुरू आहे. तर सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांच्या गटाकडून सदस्य नोंदणी सुरू असल्याचे समजते. मुळात 'कोणाच्याही' माध्यमातून झालेली सदस्य नोंदणी ही आमच्यासाठी महत्त्वाचीच आहे. आमचे पक्ष बळकटीकरणाला प्राधान्य आहे. राहील.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here