सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली पाणी मागणी क्षेत्रीय अधिका-यांकडे द्यावी. ज्या क्षेत्रातील शेतकरी वेळेत पाणीपट्टी भरतील त्यांच्याकरीताच शाखा कालवा, वितरीका, लघुवितरीका यावरील गेट मधून प्राधान्याने पाणी सोडण्यात येईल याची नोंद घ्यावी. तरी रब्बी आवर्तनासाठी पाणी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. रा. कोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सन 2024-2025 मधील रब्बी आवर्तन दिनांक १० जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आले आहे.
म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वेळेत पाणीपट्टीचा भरणा केल्यास नियमितपणाने सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच सद्यस्थितीत विद्युत देयकामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. तरी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सिंचनाची रब्बी हंगामाची प्रस्तावित पाणीपट्टी प्रती द.ल.घ.फु. रु.23,839/- इतकी असून ती वेळेत भरुन सहकार्य करावे. दिनांक 10 जानेवारी पासून लाभक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये पाणी मागणी नमुना (7) भरुन घेण्याकरीता नियोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.