मुख्याधिकाऱ्यांचे घर फोडणारा संशयित जेरबंद

0
109

आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या घरी केलेल्या चोरीचा पर्दाफाश करून आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. देवगण विजय उर्फ बापू पवार (मापटेमळा-आटपाडी) याला मध्यरात्रीनंतर अटक करत एक लाख, ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

आटपाडी शहरासह तालुक्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत मुख्याधिकारी वैमव हजारे यांचे उदयराज हॉटेलच्या पाठमागील जरे अपार्टमेंटमधील घर चोरट्यांनी फोडून ऐवज लंपास केला होता. विशेष म्हणजे याच इमारतीत पोलीस अधिकारीदेखील वास्तव्यास असुन त्यांच्या घराला बाहेरून कडी घालून चोरट्यांनी घरफोडी केली.

जिल्हा पोलीसप्रमुख संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर, डीवायएसपी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशेंद्रसिंग बायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दादासाहेब ठोंबरे, अर्जुन बोडके, विष्णू भोईनवाड, सचिन सुर्वे, गजानन देशमुखे, सायबर पोलीस विजय पाटणकर यांनी घरफोडी उजेडात आणण्यासाठी तांत्रिक तपासावर भर दिला.

ही घरफोडी देवगण विजय ऊर्फ बापु पवार, अमोल विजय ऊर्फ बापू पवार, बाज्या विजय ऊर्फ बापू पवार यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील देवगण याला पोलीसांनी अटक केली असुन अन्य दोघे फरार आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांना प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याची अंगठी, ५१ ग्रॅम वजनाचे गंठण असा १ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी पोलीस ठाणेकडील सपोनि विशेंद्रसिंग बायस, दादासाहेब ठोंबरे व सहकाऱ्यांनी घरफोडी पध्दतीचा अभ्यास करून काही आरोपी निष्पन्न केले. त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून तात्रिक विश्लेषणाने आरोपींची नावे उजेडात आणली. एकाला अटक करण्यात यश मिळविले. पकडण्यात आलेल्या चोरट्यासह निष्पन्न झालेल्या आरोपींकडून आणखी चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here