जत : राजे रामराव महाविद्यालय,जत येथे मकर संक्रांती निमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेला हळदी कुंकू व पारंपरिक वेशभूषा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून एक रोपटे एकमेकांना देत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पर्यावरणपूरक संपन्न झाला.या उपक्रमाच्या निमित्ताने “स्त्रीचे आरोग्य आणि भविष्य” या विषयावर डॉ.सरिता पट्टणशेट्टी यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले.डॉ.सरिता पट्टणशेट्टी,डॉ.निर्मला मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ.सरिता पट्टणशेट्टी म्हणाल्या,आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीशीच्या आतच अत्यंत त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य म्हणजे बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न रहाता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे.अँनिमिया (रक्तक्षय), गर्भारपणातील आजार, गर्भाशयाचा कॅन्सर आणि डायबेटिसविषयी भारतातील प्रत्येक महिलेला योग्य माहिती पुरवली पाहिजे. भारतामध्ये कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाणही खूप आहे.
स्त्रियांनी निकोप शरीर व निकोप मन याचा आग्रह धरलाच पाहिजे. हा प्रश्न भावनिक पातळीवर न पाहता स्त्री आरोग्याशी संबंधित हवा. सामाजिक परिप्रेक्ष्यातून या प्रश्नांकडे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय पाहतील, तर स्त्रियांचे आरोग्य अबाधित राहील.
आरोग्यपूर्ण जीवन जगणे हा तिचा हक्क आहे.विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित हळदी कुंकू व पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला प्राध्यापिकांनी पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून एक रोपटे एकमेकांना देत स्नेह वृद्धिंगत केला. प्रास्ताविक डॉ.मधुमती शिंदे,सूत्रसंचालन प्रा.वैशाली मदने तर आभार प्रा.शिल्पा पाटील यांनी मानले. डॉ.सतीशकुमार पडोळकर, प्रा.अनुप मुळे, प्राधनंजय वाघमोडे यांनी नियोजन केले.
पर्यावरणपूरक हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी एकमेकांना रोपटे देताना